नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील बालटालहून जम्मूकडे परतणार्या अमरनाथ यात्रेकरूंवर सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून हल्ला केल्याने सात यात्रेकरू ठार झाले असून, 19 जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक मुनीर खान यांनी दिली. अबू इस्माईल या दहशतवाद्याच्या नेतृत्वात हा हल्ला करण्यात आला असून, तत्पूर्वी त्यांनी खन्नाबल येथे सुरक्षा जवानांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी बटिंगु येथे यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. या बसमध्ये गुजरातमधून आलेले यात्रेकरू होते. मृतांचे शव विशेष विमानाद्वारे सूरत येथे पाठविण्यात आली असून, गुजरातमध्ये अतिदक्षतेचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेऊन दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी रणनीती आखली. भारत या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचा इशारा देत, अमरनाथ यात्रेकरुंच्या मृत्यूने दुःखी झालो आहोत. या घटनेचा निषेध करणार्या काश्मिरी जनतेला सलाम करत आहोत, अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर राजनाथ सिंह यांनी दिली.
बसचालकामुळे वाचले इतरांचे प्राण
2001 नंतर यात्रेकरुंच्या बसवर झालेला हा पहिलाच हल्ला आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना गुजरात सरकारने प्रत्येकी दहा लाखांची मदत जाहीर केली असून, जखमींना तातडीने दोन लाखांची मदत दिली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गुजरात भाजपने आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करत, मृतांना आदरांजली अर्पण केली. बसवर हल्ला झाल्यानंतर शौर्य दाखवत सलीम नावाच्या चालकाने बस तशीच वेगात पुढे नेली. त्यामुळे इतर प्रवाशांचे प्राण वाचू शकले, त्याच्या या शौर्याबद्दल त्याला वीरश्री पुरस्कार देण्याची घोषणाही रुपानी यांनी केली. या दहशतवादी हल्ल्यानंतर उधमपूरसह जम्मू-काश्मीरमधील अनेक भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तसेच, सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले होते. हल्लेखोरांचा तपास करण्यात येत होता. देशात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा इरादा असून, सुरक्षा दलांनी सतर्क रहावे, असा इशारा पोलिस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले. दहशतवाद्यांच्या निशाणावर यात्रेकरू, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत सैतानी शक्तींपुढे झुकणार नाही : मोदी
जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच, रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. केंद्रीय गृहमंत्री व पंतप्रधानांना दूरध्वनीद्वारे या घटनेच्या तपासाचीही माहिती दिली. यात्रेकरुंच्या बसचे टायर कसे पंक्चर झाले याची चौकशी केली जाईल, असे सांगून त्या म्हणाल्या, की या हल्ल्यानंतरही अमरनाथ यात्रा पुढे सुरु ठेवण्यात आलेली आहे. दुपारी तीन वाजता यात्रेकरुंचा एक जत्था रवाना करण्यात आला होता. या जत्थ्यात 2400 यात्रेकरुंचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या भ्याड हल्ल्याच्या वेदना शब्दांत व्यक्त करता येणार नाही, असे सांगून सर्वस्तरातून या हल्ल्याचा निषेधच व्हायला हवा. भारत हल्लेखोरांच्या द्वेष आणि सैतानी शक्तीपुढे कधीच झुकणार नाही, असेही मोदींनी ठणकावले.
अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला हा देशावरचा हल्ला असून, तो दिल्लीत बसलेल्या सरकारवर केलेला हल्ला आहे. या हल्ल्याचा केवळ निषेध करण्याची वेळ नसून दहशतवादाला चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे.
खा. संजय राऊत, नेते शिवसेना