यात्रेतील पाळण्यातून पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

0

आंध्र प्रदेश : यात्रेत जाऊन पाळण्यात बसण्याची सर्वांचीच इच्छा असते. यात्रेत गेले म्हणजे पाळण्यात बसले नाही तर यात्रेचा आनंदच नाही. मात्र यात्रेतील पाळणा कधी-कधी जीवघेणा ठरू शकतो याचे प्रत्यय आंध्रप्रदेश राज्यात आला. यात्रेत पाळण्यात बसल्यानंतर आकाशपाळण्याची ट्रॉली कोसळल्याने अनंतपूरमध्ये दहा वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूरमधल्या एका ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरु असलेल्या एका जत्रेत भव्य आकाशपाळणा होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि त्यातही रविवार असल्यामुळे जत्रेत प्रचंड गर्दी होती.

 

दारू पिऊन चालवत होते पाळणा 

हा पाळणा फिरत असताना अचानक सांधा सुटल्यामुळे ट्रॉली निखळली आणि उंचावरुन काही जण खाली पडले. या अपघाताची दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत. अपघातात अमृता नावाच्या दहा वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तीन चिमुरड्यांसह सहा जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना अनंतपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आकाशपाळण्याचा नट बोल्ट सैल झाल्याचे जत्रेतील काही जणांनी व्हील ऑपरेटरला सांगितले. मात्र त्याने मद्यपान केल्यामुळे पाळणा सुरुच ठेवला आणि हा अपघात घडला, अशी माहिती आहे.

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी त्याला बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या हवाली केले. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पाळण्यातून मुलगी खाली पडत असतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.