देहूरोड : गावातील यात्रेत दोन गटात झालेल्या भांडणावरून 16 जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील मुख्य आरोपीसह पाच जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.
प्रमोद गायकवाड (रा. मामुर्डी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार राजा राऊत, गोटू राऊत आणि अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील मामुर्डी गावात भैरवनाथ यात्रा सुरु आहे. यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सोमवारी रात्री तमाशा (लोकनाट्य) ठेवण्यात आला होता. तमाशातील लावणीवर गावातील तरुणाई थिरकत होती. दरम्यान नाचत असताना दोन गटातील मुलांची किरकोळ धक्काबुक्की झाली. याचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. त्यावरून धक्काबुक्की व मारहाण करणा-या 16 जणांविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखलकरण्यात आला. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.