पाचोरा/शेंदुर्णी/वरखेडी : तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या सावखेडा बु॥ येथील प्रसिद्ध असलेल्या भैरवनाथाच्या यात्रेस नातेवाईकांच्या नवसासाठी येत असलेल्या आयशर गाडीचा स्टेरिंगचा रॉड तुटल्याने गाडी खदानीत पलटी होवून वाहन यात चालक जागेवरच ठार झाला, तर या अपघातात 50 पैकी 40 प्रवाशी जखमी झाले. यामध्ये महिला व लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून 25 भाविकांची तब्बेत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळापासून ते जळगाव-पाचोरापर्यंत अपघातग्रस्तांना हलवण्यासाठी हिंदू-मुस्लीम समाजातील अनेकांनी मदतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केल्याने माणूसकीचे दर्शन यावेळी पाहण्यास मिळाले.
आंबेवडगाव ते वरखेडी दरम्यान दगडांच्या खदाणीजवळील घटना
सावखेडा बु॥ येथील भैरवनाथ मंदिराची आज रविवारी यात्रा असल्याने अनेक भाविक कबुल केलेले नवस फेडतात. याचप्रमाणे शेंदूर्णी, ता.जामनेर येथील शालीक तुकाराम बारी यांच्याकडे नवस असल्याने त्या नवसासाठी बर्हाणपूर, जळगाव, सोयगाव, शेंदूर्णी येथील नातेवाईक व आप्तेष्ठांना बोलावून आयशर गाडी (क्र.एम.एच.19-एस.5030) या वाहनाने शेंदुर्णीहून भैरवनाथ येथे 50 ते 60 भाविक नातेवाईक येत होते. दरम्यान सकाळी 9.30 वाजता आंबेवडगाव ते वरखेडीच्या मध्यभागी असलेल्या दगडांच्या खदाणीजवळ वाहनाचा स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व आयशर दोन ते तीन पलटी घेवून खदानीत पलटी झाली. यात रतन शिवलाल बारी (वय-54) रा.शेंदुर्णी हे जागेवर ठार झाले
पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली धावपळ
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात जेव्हा रुग्ण आले तेव्हा एकही डॉक्टर जागेवर उपलब्ध नव्हते. यावेळी पत्रकार नंदकुमार शेलकर, विनायक दिवरे यांनी शासकीय डॉक्टरांना संपर्क केला पण नेहमीप्रमाणे फोन न उचलल्याने शहरातील डॉ.प्रविण माळी, डॉ.दिनेश सोनार, डॉ.चारुदत्त खानोरे, डॉ.भूषण मगर यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात येवून उपचार सुरु केल्यानंतर शासकीय रुग्णालयातील डॉ.इम्रान शेख, डॉ.अतुल महाजन, तृप्ती सुक्रे, अर्जुन पाटील, डॉ.मनिषा भावसार यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. तर रुग्णांना वाहनातून दवाखान्यात आणण्यासाठी नगरसेवक विकास पाटील, सतिष चडे, किशोर बारावकर, हेमंत नागणे, अशोक महाजन, सुधाकर महाजन, गौरव वाघ, किशोर डोंगरे यांच्यासह पाचोर्यातील असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी धावपळ केली.
अपघातात हे भाविक झाले जखमी
वसंत नथ्थू बारी (55,रा.शेंदुर्णी), कल्याणी बारी (वय-11 रा.शेंदुर्णी), धीरज बारी (वय-15 रा.जळगाव), सुरेश बारी (वय-30 रा.जळगाव), गायत्री नवे (वय-18 रा.बर्हाणपूर), सुनिता बारी (22 रा. बर्हाणपूर), सुरक्षा बारी (वय-18 रा. शेंदुर्णी), स्वाती बारी (वय-25 रा.बर्हाणपूर), कोमल बारी (वय-20 रा. बर्हाणपूर), सरीता बारी (वय-12 रा.शेंदुर्णी), सोनाली बारी (वय-25 रा.शेंदुणी), योगेश बारी (वय-10 रा.शेंदुर्णी), मंगला बारी (वय-65 रा.शेंदुर्णी), गोपाल बारी (वय-12 रा.शेंदुर्णी), गणेश बारी (वय-17 रा.शेंदुर्णी), वैशाली बारी (वय-34 रा.जळगाव), राची बारी (वय अडीच रा. बर्हाणपूर), अमोल बारी (रा.शेंदुर्णी), अंकिता बारी (रा.शेंदुर्णी), धोंडाबाई राऊत (वय-41 रा.सोयगाव) हे जखमी झाले. यातील 20 ते 25 जणांची प्रकृती गंभीर असल्याने पाचोरा येथील ग्रामीण खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी जळगाव हलवण्यात आले.
आमदारांनी दिली भेट
ग्रामीण रुग्णालयात तालुक्याचे आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, पोलीस उपअधिक्षक केशव पातोड, तहसीलदार दिपक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे, आर.आर.भोर, पिंपळगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उद्धव मराठे यांनी भेटी देवून रुग्णांची चौकशी केली. दरम्यान अपघात स्थळाहून जळगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना आणण्यासाठी दिलीप जैन, इसाप पठाण, हर्षल पाटील, शेख इमाम, नाना चौधरी, योगेश सपकाळे, अनिल शिंदे, नाना निकम यांनी खाजगी वाहनांसह मिळेल त्या साधनांनी रुग्णांना उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था करत होते.