सीएसआर फंडातून, लोकसहभागातून सफाई
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून 180 नैसर्गिक नाले आहेत. या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया राबविली जात होती. त्यासाठी 25 लाख रुपये खर्च येत होता. निविदा प्रक्रिया राबवून देखील नालेसफाई होत नाही. त्यामुळे यापुढे सीएसआर फंडातून आणि लोकसहभागातून नालेसफाई करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र निविदा काढली जाणार नाही. पिंपरी-चिंचवड शहर परिसरात छोटे-मोठे मिळून 180 नाले आहेत. पालिकेच्यावतीने बांधलेल्या नाल्यांची (बांधीव नाले) वर्षभर साफसफाई केली जाते. उर्वरित नाल्यांची पावसाळ्याच्या अगोदर साफसफाई केली जाते. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे केली जातात. दरवर्षी मे महिन्यात साफसाफई केली जाते. परंतु, यंदा मार्च महिन्यापासूनच नाल्यांची साफसाफई मोहिम हाती घेतली आहे.
यापुढे सीएसआर फंडातून आणि लोकसहभागातून नालेसफाई केली जाणार आहे. त्यामुळे नालेसफाईवर होणार्या 25 लाख रुपये खर्चाची बचत होईल. यापुढे नालेसफाईसाठी निविदा न काढण्याचे धोरण अवलंबण्यात येणार आहे, असे स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांनी सांगितले.