महापालिका करणार 17 लाखांची बचत
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यासाठी निमंत्रण पत्रिका छापल्या जात होत्या. मात्र यापुढे निमंत्रण पत्रिका छापण्यात येणार नाहीत. तसेच स्मृतिचिन्ह देखील दिले जाणार नाही. याबाबतचा निर्णय बुधवारी झालेल्या स्थायी समितीमध्ये घेण्यात आला. यामुळे महापालिकेची 17 लाख 17 हजार 135 रुपयांची बचत होणार आहे.
अनावश्यक खर्च
महापालिकेच्यावतीने जनसंपर्क विभाग, क्रीडा व सास्कृतिक विभाग व अन्य विभागाकडून महापालिकेने होणारे विविध कार्यक्रम व भुमिपूजन, उद्घाटन अशा विविध कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका छापल्या जातात. तसेच स्मृतिचिन्ह दिले जाते. यावर मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च होत आहे. क्रीडा विभागाने 8 हजार 200 निमंत्रण पत्रिका छापल्या होत्या. त्यासाठी 80 हजार रुपये खर्च झाला. जनसंपर्क विभागाने 800 निमंत्रण पत्रिका छापल्या होत्या. त्यासाठी सात लाख 96 हजार रुपये खर्च आला आहे. 1156 स्मृतिचिन्ह बनवून घेण्यात आले होते. त्यासाठी आठ लाख 33 हजार रुपये खर्च आला आहे. एकूण 17 लाख 17 हजार 135 रुपये खर्च झाला आहे.
त्यामुळे यापुढे निमंत्रण पत्रिका ही कायमस्वरुपी छापणे बंद करुन संगणकाद्वारे निमंत्रण पत्रिका बनविण्यात यावी. त्याची झेरॉक्स प्रती बनवून वाटण्यात यावी. तसेच स्मृतीचिन्ह देखील दिले जाऊ नये, असा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास असल्यास अपवादात्मक बाब म्हणून फोर कलर निमंत्रण पत्रिका बनविण्यात येणार आहेत.