नवी दिल्ली: २०१२ मधील संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना आज शुक्रवारी २० मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. फाशी टळावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आरोपींनी प्रयत्न केले. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास दोषींची याचिका फेटाळून लावली. राष्ट्रपतींनी दया याचिका देखील फेटाळल्याने फाशीचा मार्ग मोकळा झाला. या निकाल निकालानंतर निर्भायाची आई आशा देवी यांनी आनंद व्यक्त केला. ७ वर्षानंतर का होईना, पण न्याय मिळाल्याने निर्भायाच्या आईने आनंद व्यक्त केला. आता यापुढे २० मार्चचा दिवस ‘निर्भया’ दिवस म्हणून साजरा केला जाईल. देशातील इतर मुलींसाठी आपला संघर्ष कायम ठेवणार आहोत असेही निर्भायाच्या आईने म्हटले.
निर्भायाच्या आईचे शब्द
“आज आमच्यासाठी मोठा दिवस आहे. आज महिलांच्या सुरक्षेचा आणि न्यायाचा दिवस आहे. आजचा दिवस न्यायदिवस म्हणून ओळखला जाईल. आज माझ्या मुलीला न्याय मिळाला. आजचा दिवस हा महिलांचा आहे. उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला. यासाठी सर्वांचे आभार. न्यायव्यवस्थेचेही आभार मानते,” अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने नोंदवली. ज्या प्रकारे त्यांची फाशी पुढे ढकलली गेली त्यातून न्यायव्यस्थेतील कमतरता दिसून आली. परंतु आम्हाला न्याय मिळाला, न्यायव्यवस्थेवर विश्वास कायम राहिल, असे निर्भयाची आई म्हणाली.