यावर्षापासून प्रथमच पैठणहून दोन दिंड्या

0

पैठण । पंढरपूरच्या आषाढी सोहळ्यासाठी पैठण येथून दोन दिंड्या निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाथांची पालखी घेऊन जाण्याचे अधिकार दत्तकपुत्र रघुनाथ महाराज यांच्याकडे गेल्याने नाथवंशजांनी स्वतंत्र दिंडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही दिंड्यांचे पैठण ते पंढरपूरचे भिन्न मार्ग असल्याने प्रशासनास दक्ष राहावे लागणार आहे.

दिंडीचा अधिकार सर्वांना
आषाढी सोहळ्यात शेकडो वर्षांपासून पायी दिंडीने जाण्याची परंपरा जोपासण्यासाठी आम्ही दिंडी घेऊन पंढरपूरकडे जाणार आहोत, असे नाथवंशज छय्या महाराज गोसावी यांनी स्पष्ट केले. पंढरपूरसाठी दिंडी घेऊन जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. पंढरपूरच्या विठोबाशी नाथवंशजांचे अनेक पिढ्यांपासून नाते आहे. यामुळे आम्ही नाथवंशज दिंडी घेऊन जाणार आहोत. आमच्या दिंडीत वारकरी सहभागी होतात. त्यांना आमच्या दिंडीत येऊ नका, असे आम्हाला म्हणता येणार नाही, असे छय्या महाराज यांनी सांगितले. पैठण येथून दोन दिंड्या पंढरपूरसाठी रवाना होणार आहेत. यामुळे नियमित पालखीसोबत जाणार्‍या वारकर्‍यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोणत्या दिंडीत जावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोणता झेंडा घेऊ हाती, अशी अवस्था वारकर्‍यांची झाली आहे.