यावलकरांवर जलसंकट ; चार दिवस पुरेल इतकाच जलसाठा

0

उपनगराध्यांसह नगरसेवकांकडून तलावाची पाहणी ; पाटचारीद्वारे पाण्याची मागणी

यावल- शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावात जेमतेम चार ते पाच दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असून तलावातील वीज पंप तळाशी आल्याने वेळेच पाण्याचे आवर्तन न सुटल्यास नागरीकांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार आहे. गुरुवारी पालिकेचे उपनगराध्यक्ष राकेश कोलते यांच्यासह माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, गणेश महाजन, धीरज महाजन, पाणीपुरवठा अभियंता राजेंद्र देवरे यांनी भेट देऊन पाहणी केली.

लिकेजमुळे पाण्याला गळती
यावर शहराला हतनूर धरणातून पाटचारीद्वारे नगरपालिकेच्या साठवण तलावात पाणी सोडले जाते तर शहराला साधारणपणे तीन महिने पुरेल एवढा साठा त्यात असतो मात्र लिकेजमुळे पाण्याला गळती लागून अवघा दोन महिन्यांपर्यंत पाणीसाठा टिकत असल्याने आता शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. पाणीसाठा अत्यल्प असल्यामुळे विरोधी गटाने प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एस.एच.चौधरी यांच्याशी संपर्क साधत नगरपालिकेचे पाटबंधारे विभागाकडे रोटेशन हक्काचे असून ते आम्हाला मिळण्याची मागणी केली. चौधरी यांनी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर सोमवारपर्यंत अमळनेर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार असून त्याच वेळेस यावलसाठी सुद्धा पाणी सोडण्यात येईल, असे सांगितले.