यावलच्या आंदोलनात आमदार जावळेंच्या राजीनाम्याची मागणी

0

भाषणाविनाच आमदारांचा काढता पाय : घोषणांनी परीसर दुमदुमला

यावल (पराग सराफ)- मराठा समाज आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र यावल येथे आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम असल्याने शहर बंदऐवजी दुपारी दोन नंतर भुसावळ टी पॉईंटवर केवळ ठिय्या आंदोलन करण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे आंदोलन सुरू असताना आमदार हरीभाऊ जावळे आंदोलनस्थळी आले. समाजाला आरक्षणाची गरज का आहे या संदर्भात माजी नगराध्यक्ष अतुल पाटील मार्गदर्शन करीत असताना आमदार तेथे आले. पाटील यांनी आपण ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहात त्या रावेर-यावल मतदार संघात सुमारे 50 हजार मराठा मतदार असून आमदारांनी आपली भूमिका आपण स्पष्ट करावी, असे आंदोलकांसमोर सांगितले. यानंतर आमदारांनी माईकचा ताबा घेत आपला आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे, असे सांगताच आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आधी आमदारांनी राजीनामा द्यावा व भूमिका स्पष्ट करावी व नंतर आमच्यात सहभागी व्हावे, असे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून सांगितले. आमदारांनी समाजाची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याची ग्वाही दिली मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर आमदारांना भाषणाविनाच आंदोलन स्थळावरून काढता पाय घ्यावा लागला. या प्रकाराची माहिती राजकीय वर्तुळात पसरताच मोठी खळबळ उडाली.