रुग्णालयातच महिलेसोबत अश्लील चाळे भोवले ; रुग्णालय प्रशासन कारवाई करणार
यावल- ग्रामीण रुग्णालयामध्ये एचआयव्ही एड्स समुपदेशन केंद्रात चक्क समुपदेशकच एका महिलेसोबत अश्लिल चाळे करताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागरीकांनी आरोपीला रंगेहात पकडून त्याला बेदम चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती शहरात वार्यासारखी पसरल्याने पोलिस स्टेशन व ग्रामीण रुग्णालयात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
सुटीच्या दिवशी रासलीला
यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये एड्स समुपदेशन केंद्र आहे. या समुपदेशन केंद्रात आरोपी रवींद्र माळी हा समुपदेशक म्हणून कार्यरत आहे. मंगळवारी सुटीचा दिवस असल्याने रुग्णालयामध्ये शांतता होती मात्र रुग्णालयात प्रसुतीसाठी महिला आली होती. दरम्यान, रुग्णालयात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास या समुपदेशन केंद्रात आतून दरवाजा बंद अवस्थेत आढळून आला. रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या त्या महिलेसोबत आलेल्या काही नागरीकांनी दरवाजा ठोठावला असता केंद्रात आरोपी रवींद्र माळी एका महिलेसोबत अश्लिल चाळे करीत होता. नागरीकांनी त्याला रंगेहात पकडले. नागरीकांची गर्दी पाहताच संबंधित महिलेने तेथून काढता पाय घेतला. नागरीकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस निरीक्षक डी.के. परदेशी यांच्या नेतृत्त्वात पुढील तपास सुरु आहे.
चौकशीअंती कारवाई -डॉ.मनोज पाटील
रुग्णालयात घडलेली घटनेची माहिती मिळाली आहे. रुग्णालयात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामधून सदर महिला केव्हा आली होती. नंतर काय प्रकार झाला हे समोर येईलच. प्रकाराची चौकशी करून विभागाअंतर्गत संबंधितांवर निलंबनाची या कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.मनोज पाटील म्हणाले.