लाचखोरी भोवली ; बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा धाक दाखवत लाखो लाटले, एकाला अटक
भुसावळ : यावल पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक बळीराम हिरे यांच्यासह अन्य दोघा कर्मचार्यांविरुद्ध लाचेची मागणी केल्याने यावल पोलिसात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी तथा पोलीस नाईक किरण पांडुरंग ठाकरे यास सायंकाळीच अटक करण्यात आली.
बलात्काराच्या गुन्ह्याचा धाक दाखवत लाटले लाखो
यावल पोलीस ठाण्याचे तत्कालीक निरीक्षक बळीराम हिरे, पोलीस नाईक कैलास नारायण इंगळे व नाईक किरण पांडुरंग ठाकरे यांनी तक्रारदाराच्या घरी जात एका तरुणीने अर्ज दिल्याचे सांगून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पाच लाखांची मागणी केली तर तक्रारदाराने रक्कम जास्त होत असल्याचे सांगत तीन लाखांची जमवा-जमव करू, असे सांगितले. यानंतर तक्रारदारासोबत 13 जानेवारी रोजी दोघे संशयीत आरोपी पोलीस नाईक जळगावच्या अॅक्सीस बँकेत गेले व 40 हजारांची रक्कम स्वीकारण्यात आली. यावेळी तक्रारदाराचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला. तक्रारदाराने मोबाईल परत देण्याची मागणी केल्यानंतर दोघा कर्मचार्यांनी 20 हजारांची मागणी केली. तक्रारदार यांनी भीतीपोटी 21 जानेवारी रोजी कैलास इंगळे यांना 80 हजार रुपये दिले तर याबाबत 23 जानेवारी रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आली.
सापळ्यादरम्यान रेकॉर्डींग केले डिलीट
तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर आरोपींना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराची झडती घेतली असता त्यात रेकॉर्डर आढळल्याने त्या दोघा कर्मचार्यांनी त्यातील रेकॉर्डींग डिलीट केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
‘कलीना’वरून डाटा झाला रिकव्हर
जळगाव एसीबीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक पराग सोनवणे व या गुन्ह्याचे तपासाधिकारी तथा तत्कालीन निरीक्षक बी.एस.नरके यांनी मुंबईच्या ‘कलीना’ फॉरेन्सीक लॅबवरून डिलीट केलेला रेकॉर्डींग पुन्हा रिकव्हर केला तर नाशिक पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागण्यात आली मात्र तब्बल नऊ महिन्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कर्मचार्यास अटक, निरीक्षकांचा शोध
तत्कालीन निरीक्षकांसह दोघा कर्मचार्यांनी तक्रारदाराकडून एक लाख 20 हजारांची लाच घेतल्याचे व मागितल्याचे सिद्ध झाल्याने उभयंतांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी पोलीस नाईक किरण पांडुरंग ठाकरे यास सोमवारी रात्रीच अटक करण्यात आली. तत्कालीन निरीक्षकासह अन्य कर्मचार्याचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास जळगाव एसीबीचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.