यावलच्या तरुणाचा नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू

0

यावल- जळगाव तालुक्याच्या सीमेवरील तालुक्यातील पिळोदा खुर्द व जळगाव तालुक्यातील देवुवाडे या गावादरम्यान असलेल्या तापी नदीपात्रात बुडाल्याने यावलमधील तरुणाचा मृत्यू झाला. आसीफ हाफिज पटेल (24, विरार नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली तर रात्री घटनेचे वृत्त समजताच परीसरातील नागरीकांनी येथील पिळोदा येथे धाव घेतली असुन मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. अंधारामुळे मृतदेह शोधण्यात अडचणी आल्या तर रात्री उशिरा मृतदेह आढळल्यानंतर शवविच्छेदनासाठी तो जळगाव येथे हलवण्यात आला.

खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला
जळगाव तालुक्यातील देवूलवाडे येथे घोड्यांची शर्यत पाहण्यासाठी आसीफ मित्रांसह गेला होता. परतत असतांना तापी नदीपात्रात पोहण्यासाठी नदीपात्रात उतरला असता व खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. पिळोदा येथील उपसरपंच मनोहर पाटील, कांतीलाल पाटील व देवूलवाडे येथील पोलीस पाटील संतोष सोनवणे व ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढण्याकामी सहकार्य केले. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परीवार आहे. बुधवारी दुपारी या तरुणाच्या मृतदेहावर दफनविधी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.