जिल्हाधिकार्यांचा निर्णय ठेवला कायम ; निकालाविरूध्द तक्रारदार खंडपीठात जाणार
यावल – व्हीप झुगारल्याप्रकरणी यावल पंचायत समितीच्या सभापती संध्या महाजन यांना जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरविले होते. या निकालाविरूध्द त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे दाद मागितली होती. तब्बल नऊ महिने चाललेल्या युक्तिवादानंतरही महाजन यांना दिलासा मिळाला नाही तर मुंडे यांनी जिल्हाधिकार्यांनी दिलेला निर्णय योग्य ठरवत महाजन यांना अपात्र घोषीत केले. या निकालाविरूध्द महाजन आता औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहे.
काँग्रेसचा टेकू घेत महाजन झाल्या होत्या सभापती
यावल पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजप गटनेता दीपक पाटील यांनी अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याबाबत व्हीप बजावला मात्र आपण भाजपचे सदस्य असतांना अपक्ष उमेदवार पल्लवी चौधरी यांना मतदान करणार नाही, अशी भूमिका घेत संध्या किशोर महाजन यांनी काँग्रेस उमेदवारांचा टेकू घेत सभापतीपद मिळवले होते. दोन्हीही उमेदवारांना समसमान मते मिळाल्यानंतर ईश्वरचिठ्ठीत संध्या महाजन यांना संधी मिळाली होती. भाजपने बजावलेला व्हीप झुगारला म्हणून संध्या महाजन यांना अपात्र करण्याबाबत गटनेता दीपक पाटील व तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे यांनी जिल्हाधिकार्यांकडे याचिका दाखल केली होती. जिल्हाधिकार्यांनी महाजन यांना अपात्र ठरवल्यानंतर या निर्णयाविरोधात 22 ऑगस्ट 2017 रोजी ग्रामविकास राज्यमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे दाद मागण्यात आली. मात्र नऊ महिने चाललेल्या अपील प्रकरणात महाजन यांना दिलासा मिळाला नाही व जिल्हाधिकार्यांचा निर्णय कायम ठेवण्यात आला.
खंडपीठात दाद मागणार- संध्या महाजन
आपला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असून या निकालाविरोधात आपण औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याचे संध्या महाजन म्हणाल्या. मी व माझे पती भाजपची पाळेमुळे रोवण्यासाठी तालुक्यात निष्ठेने काम केले आहे व पक्षवाढीसाठी यापुढेही आम्ही झटत राहू, असेही त्या म्हणाल्या.