आरोपींना न्यायालयाने सुनावली 16 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
यावल- शहरात जुलै महिन्यात झालेल्या घरफोडी प्रकरणी यावल पोलिसांनी रेकॉर्डवरील दोघा गुन्हेगारांना अटक केली असून न्यायालयाने आरोपींना 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. असलमखान मजीदखान (रा.इस्लामपुरा) व शे.जाबीर शे. निसार(रा.खिर्णीपुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. शहरात गत महिन्यातील 8 जुलै रोजी शहरालगतच्या विस्तारित भागात चोरट्यांनी एकाच रात्री चार घरे फोडून 25 हजार रुपये रोख आणि 70 हजार रुपयांचे दागिने लांबवले होते. या प्रकरणी पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे यांच्या पथकाने शनिवारी रात्री शहरातील दोन संशयितांना अटक केली. यावल न्यायालयाने दोघांना 16 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
विस्तारीत भागात झाल्या होत्या चोर्या
8 जुलै रोजी रात्री फैजपूर रस्त्यावरील हरी ओमनगरातील गणेश डेंगे यांच्या घरातून देवाच्या चांदीच्या मुर्त्या व 1600 रुपये रोख, चांद नगरातील सय्यद इरफान निजामुद्दीन यांच्या घरातून 15 ग्रॅम सोन्याचे व 100 ग्रॅम चोंदिच्या दागिन्यांसह 10 हजाराची रोकड, अमृत सुभान पटेल यांच्या घरातून 15 हजार रुपयांची अंगठी व पाच हजार रुपये रोख, शे. अमीन शे. यासीन यांच्या घरातून 19 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली होती. एकाच रात्री चार घरांमध्ये चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. या चोर्या वरील दोघा आरोपींनी केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे निरीक्षक परदेशी म्हणाले.