यावलमधील शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रकरण ; शालेय समिती अध्यक्षांसह सचिव तहसीलदारांपुढे मांडणार म्हणणे
10 रोजी तहसीलदारांनी पुराव्यानिशी म्हणणे मांडण्याबाबत बजावली नोटीस
यावल- शिक्षण विभागाची परवानगी न घेता येथील नगरपालिका पालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमीक विद्यालयात अनधिकृत शिक्षकेत्तर नोकर भरती करून निवड केलेल्या उमेदवारांना मागील तारखांवर सेवेत रूजु करून घेतल्याचा आरोप शालेय समितीवर असल्याने शालेय समीतीचे याबाबतीत काय म्हणने आहे त्यासाठी शालेय समिती अध्यक्ष तथा नगरसेवक दीपक बेहेडे आणि समिती सचिव तथा मुख्याध्यापक एस.आर.वाघ यांनी त्यांचे म्हणने मांडण्यासाठी योग्य पुराव्यानिशी 10 एप्रिल रोजी येथील तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी सोमवारी दिले आहेत.
अतुल पाटलांच्या तक्रारीची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल
पालिका संचलित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कनिष्ठ लिपिक व तीन प्रयोग शाळा सहाय्यक पदाच्या अशा चार जागांसाठी शालेय समीतीने गेल्या महीन्यात आठ मार्चला संबंधित इच्छुक उमेदवारांच्या लेखी व तोंडी स्वरूपात मुलाखती घेवून भरती प्रक्रीया राबविली. 10 मार्चपासून लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागु झाली आहे. आचारसंहितेत कर्मचा-यांना निवडीचे पत्र देवून मागील तारखांवर त्यांना स्वाक्षर्या करावयास लावल्या, अशा आशयाची तक्रार नगरसेवक पाटील यांनी 26 मार्च मार्चला केली होती. त्यानंतर पाटील यांनी पुन्हा 5 एप्रिल रोजी मागील 26 मार्चच्या पत्राचा संदर्भ देत कर्मचार्यांना 27 मार्च रोजी विद्यालयात बोलावून त्यांना निवडीचे आदेश देवून 9 मार्च पासून हजेरी पत्रकावर सह्या करावयास लावल्या. आपल्याकडे 26 तारखेपर्यंतचे हजेरी पुस्तकाच्या छायांकीत प्रती आहेत तसेच विद्यालयात थंब मशीन लावलेली आहे त्यानुसारचा अहवाल पाहिल्यास शालेय समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांनी आचार संहीतेचा भंग केला असल्याची तक्रार दिल्यावरून अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी येथील तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना 5 एप्रिल रोजी दुरध्वणीवरून दिलेल्या आदेशान्वये तहसीलदार कुंवर यांनी शालेय समिती अध्यक्ष दीपक बेहेडे व मुख्याध्यापक वाघ यांना 10 एप्रील रोजी तहसील कार्यालयात तक्रारदाराने उपस्थित केलेल्या मुद्यांचे खंडण करण्यासाठी पुराव्यानुसार समक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.