यावल : शहरातील बाबुजीपुरा परीसरातील लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर पालिका प्रशासनाने हा परीसर सील केला आहे तर प्रतिबंधीत क्षेत्रातील सुदर्शन चित्र मंदिर परीसरातील एक डॉक्टरदेखील पॉझीटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी डॉक्टरांचा 20 वर्षीय मुलगादेखील पॉझीटीव्ह आला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रविवारी वाढलेल्या दोन रुग्णांमध्ये प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
यावलमध्ये रुग्ण संख्या झाली पाच
नव्या रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे प्रशासनास अधिक सर्तकता बाळगावी लागणार असून रविवारी तहसीलदार जितेंद्र कुंवर, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी, पोलिस निरीक्षक अरूण धनवडे, आरोग्य यंत्रणा तसेच नगर परीषदे कर्मचार्यांनी बाधीत रुग्ण राहत असलेल्या परीसराला भेट देत निर्जतुकीकरणाच्या सूचना केल्या. दरम्यान यावल तालुक्यातील दहिगाव येथे एक, कोरपावलीत दोन, फैजपूर येथे दोन तसेच यावलमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. यावल शहरात एकूण बाधीतांची संख्या पाच झाली असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभुमीवर सुरक्षतेच्या दृष्टीकोणातुन शहरातील सुमारे शंभर लोकांना कॉरंटाईन करण्यात आले आहे.