यावलमध्ये गॅरेजला आग लागून तीन वाहने खाक

0

11 लाखांचे नुकसान ; गॅरेज चालकाला आर्थिक फटका

यावल- भुसावळ रस्त्याला लागून असलेल्या गॅरेजला मध्यरात्रीनंतर अचानक आग लागून सुमारेे 11 लाख रुपये किमतीची तीन चार चाकी वाहने खाक झाली. अचानक लागलेल्या आगीमुळे गॅरेजचे शेडदेखील खाक झाले. ळालेली वाहने ही गॅरेजमध्ये दुरुस्तीकरीता लावण्यात आली आहे. या आगीमुळे गॅरेज चालकास मोठा आर्थिक फटका बसला आहे. महसूल विभागाकडून या घटनेचा पंचनामा केला जात आहे यापूर्वी या गॅरेजमध्ये आग लागुन दुचाकी वाहने जळाल्याचीही घटना घडली होती.

आगीचे कारण गुलदस्त्यात
यावल-भुसावळ रस्त्यावर बीएसएनएल कार्यालयाच्यापुढे योगेश रमेश नेमाडे याचे दुचाकी व चारचाकी वाहन दुरुस्ती करण्याचे गॅरेज आहे. या गॅरेजला बुधवारी मध्यरात्री आग लागल्याने नईम छोटू पटेल (रा.विरार नगर, यावल) यांच्या मालकीची सात लाख रुपये किंमतीची बोलेरो (एम.एच. 19 बी.यु. 557) तसेच नरेंद्र कोळी (मनवेल) यांची दोन लाख रूपये किंमतीची इंडीका (क्रमांक एम.एच.43 एन. 1455) व दहिगाव येथील एका ग्राहकाची दोन लाख रुपये किंमतीची इंडीका (क्रमांक एम.एच.05 ए.बी.0370) ही वाहने जळून खाक झाली. सुमारे 11 लाखांचे नुकसान या घटनेत झाले आहे. आगीत गॅरेजचे शेड आणि त्यातील साहित्यदेखील नष्ट झाले आहे. गॅरेजमध्ये दुरुस्ती करीता लावलेले वाहनं जळाल्यामुळे गॅरेज चालकांस ग्राहकांकडून मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेचा तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी एस.व्ही.सूर्यवंशी यांनी पंचनामा केला. याबाबत यावल पोलिसात देखील आगीची तक्रार देण्यात आली.