लाखोंच्या ऐवजावर डल्ला : पोलिसांची गस्त ठरतेय तोकडी
यावल- पोलिसांची गस्त भेदून चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल चार ठिकाणी घरफोड्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जुन्या चोर्या-घरफोड्यांचा तपास थंडबस्त्यात असताना होणार्या चोर्यांमुळे नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे. शहरात विस्तारित भागांतील चाँद नगरमध्ये तीन तर त्याला लागून असलेल्या आयशा नगरमध्ये एक घरफोडी झाल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. विशेष म्हणजे चारही घरे बंद असल्याने चोरट्यांना काम फत्ते करता आले. एक कुटुंब सोमवारी परतल्यानंतर चोरी उघडकीस आली तर त्यांच्या घरातील रोख रकमेसह सुमारे सत्तर हजाराचा एैवज चोरट्यांनी लांबवला आहे. इतर तीन कुटुंबीय बाहेर गावाहून आल्यानंतर नेमक्या गेलेल्या ऐवजाची माहिती कळू शकणार आहे.
पोलिसांची गस्त थांबल्याने चोरट्यांना संधी
चांद नगरातील सैय्यद इरफान निजामुद्दीन हे रविवारी रात्री आपल्या घराला कुलूप लावून शहरात असलेल्या डांगपुरा येथील त्यांच्या जुन्या घरी मुक्कामी होते. सकाळी घरी आले असता कडी-कोयंडा तुटलेला असल्याचे व घरातील कपाटाची तोडफोड केल्याचे त्यांना आढळले तसेच दहा हजारांची रोकड व गल्ल्यातील पाच हजारांची चिल्लर मिळून 15 हजारांची रोकड चोरीला गेली तर शंभर ग्राम चांदीचे दागिने व 15 ग्राम सोन्याचे दागिने असा एकूण 70 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचे सूत्रांनी सांगितले. सैय्यद यांच्या घरासमोरील रहिवासी अमृत सुभान पटेल यांच्यासह शेख अमीन शेख यासीन हे गावाला गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधत घरफोडी केली तसेच आयशा नगरमधील रहिवासी शेख मुशीर यांच्याही बंद घराला चोरट्यांनी टार्गेट केले. सोमवारी दुपारी सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे, हवालदार गोरख पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी संबंधित नागरिकांना आपल्या घरातील किती रोख रक्कम व ऐवज चोरीला गेले आहे, या संदर्भात फिर्याद देण्यासाठी पोलीस स्थानकात येण्याचे सांगण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या भागात पोलिसांनी गस्त बंद केल्याने चोरट्यांना रान मोकळे झाले असून गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.