यावलमध्ये दहा मिनिटात सराफा दुकाने लुटले : दरोडेखोरांचा जिल्ह्यात शोध
दरोड्यानंतर यावल शहरातील सराफा व्यावसायीक धास्तावले : रेकी करून लूट करण्यात आल्याचा अंदाज
यावल : यावल शहरातील गजबजलेल्या सराफा गल्लीत भर दिवसा पिस्टलाच्या धाकावर पडलेल्या दरोड्याने सराफा व्यावसायीकांसह अन्य व्यावसायीक धास्तावले आहेत. या प्रकारामुळे शहराची कायदा-सुव्यवस्थाही धोक्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे. भर दिवसा चोरट्यांनी सराफा व्यावसायीकास बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवत तब्बल 24 तोळे व 55 हजारांची रोकड लांबवली असून जिल्हाभरात दरोडेखोरांचा पाच पथकांद्वारे शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, 2002 मध्ये याच दुकानात धाडसी 55 लाखांची चोरी झाल्याची आठवण जाणकार सांगतात.
सिनेस्टाईल ओलीस ठेवत केली लूट
शहरातील सराफा गल्लीत जगदीश कवडीवाले यांचे बाजीराव काशिदास कवडीवाले नामक सराफा दुकान आहे. बुधवारी दुपारी दुकानात संचालक जगदीश कवडीवाले हे एकटेच बसले असताना एक वाजेच्या सुमारास तोंडाला मास्क लावलेले 22 ते 25 वयोगटातील तीन तरुण आले व त्यांनी सोन्याची अंगठी बनवायची असल्याचे सांगून दुकानदारास बोलण्यात गुंग ठेवत असतानाच बाहेर रेकी ठेवून असलेला चौथा संशयीत दुकानात शिरला. यावेळी एकाने आपल्याकडील पिस्टल कवडीवाले यांच्या डोक्याला लावत ‘हालायचे नाही, बर्या बोलाने माल द्या, अन्यथा गोळी मारू’ असे सांगत कवडीवाले यांना ओलीस ठेवले. कवडीवाले यांनी जे पाहिजे ते घ्या, असे म्हणतात दरोडेखोरांनी काऊंटरच्या चाव्यांचा शोध सुरू करीत गल्यातील 55 हजारांची रोकड लुटली तसेच काऊंटरच्या काचा फोडून सोबत आणलेल्या युरीयाच्या गोणीत पटापट सोन्या-चांदीचे दागिने भरले.
व्यावसायीकाच्या वडिलांनाही कोंडले
चोरट्यांनी लूट करताना सराफा दुकानाचे मुख्य शटर लावून घेतले व त्याचवेळी कवडीवाले यांचे वडिल रत्नाकर बाजीराव कवडीवाले जेवण करून दुकानावर आले मात्र दुकानाचे शटर लावले असल्याने त्यांनी मुलास आवाज दिल्याने चोरटे काहीसे भेदरले व त्यांनी कवडीवाले यांना बाहेर कोण आहे? अशी विचारणा केल्याने त्यांनी आपले वडिल आल्याचे सांगताच सांगताच चोरट्यांनी शटर उचकावून रत्नाकर कवडीवाले यांना दुकानात आत घेत खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. आपल्या मुलाला बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवल्याचे पाहून रत्नाकर कवडीवाले हबकले मात्र त्याचवेळी मुलाने त्यांना खुर्चीवर गुपचूप बसून राहण्याचा इशारा केला.
गोळीबार करताना पिस्टल पडल्या
सराफा दुकानात दागिन्यांची लूट केल्यानंतर चोरटे दुकानाबाहेर येताच पुन्हा त्यांनी शटर लावले व त्याचवेळी दुकानाबाहेर उभ्या केलेल्या काळ्या रंगाच्या एकाच पल्सरवर चौघे चोरटे बसले मात्र त्याचवेळी भेदरलेल्या अवस्थेत जगदीश कवडीवाले यांनी चोर-चोर म्हणत दुकानाबाहेर येऊन आवाज दिल्यानंतर चोरट्यांनी धुम ठोकली. कवडीवाले यांचा आवाज ऐकून याच भागात असलेले नगरसेवकाचे भाऊ राजु श्रावगी यांनी दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता एका दरोडेखोराने त्याच्याजवळील पिस्टलातून श्रावगी यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याने ते दुचाकीआड लपले मात्र पिस्टल लॉक झाल्याने ते जमिनीवर फेकून लुटारू पसार झाले. काही अंतरावर असलेल्या आयडीबीआय बँकेजवळ जमीर शेख या तरुणाने दरोडेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला व त्याचवेळी दुचाकीवरील चौथा दरोडेखोर जमिनीवर पडला व त्याचे पिस्टलही पडल्याने जमाव धावताच संशयीत धोबीवाड्याकडून नगरपालिका नदीमार्गे पायीच पसार झाला. दरम्यान, घटनास्थळावरून दोन लोडेड पिस्टल पोलिसांनी जप्त केले असून त्यात सहा जिवंत काडतूस असल्याचे निरीक्षक सुधीर पाटील म्हणाले.
जिल्हा पोलीस अधीक्षकांची धाव
भर दिवसा पडलेल्या दरोड्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे,
अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी दाखल होत माहिती जाणून घेतली. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आल्यानंतर त्याने काही अंतरापर्यंतचा माग दाखवला तर तज्ज्ञांनी चोरट्यांची ठसे टिपले.