यावलमध्ये निंबाच्या झाडावर ट्रक धडकला : चालक गंभीर

0

यावल : रस्त्याच्या कडेवर असलेल्या निंबाच्या झाडावर ट्रक धडकून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात फैजपूर रस्त्यावरील चितोडा गावाजवळ सोमवारी मध्यरात्रीनंतर दिड वाजेच्या सुमारास घडला. अपघात इतका भीषण होता की, ट्रकचा चक्काचूर झाला. जखमी चालकास एक तासांच्या परीश्रमानंतर बाहेर काढण्यात यश आले. अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर चितोडा गाव आहे. या गावाच्या पुढे सोमवारी मध्यरात्रीनंतर रावेर येथून मका घेवून ट्रक (क्रमांक जी. जे. 01 ई. टी. 4086) हा भरधाव वेगात येत असताना चालकाचेे नियंत्रण सुटल्याने सदरील ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडाला धडकला. यात अपघात इतका भिषण होता की सुमारे 40 ते 50 वर्ष वाढ झालेले निंबाचे झाड रस्त्यावर कोसळले तर ट्रकचा पुढील भागाचा चक्काचुर झाला तसेच ट्रकची बॉडीदेखील चेचीसपासून वेगळी होवून मक्याची पोती विखुरली गेली. अपघाताची माहिती यावल पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांच्यसह हवालदार सिकंदर तडवी, संजय देवरे, सिकंदर तडवी, राजेश महाजन, निलेश वाघ घटनास्थळी दाखल झाले व रात्री नागरीकांच्या मदतीने गंभीर जखमी असलेल्या चालकास उपचाराकरीता जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले.