यावल- शहरात न्यायालयाच्या जागेच्या पाहणीसाठी बुधवारी सायंकाळी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालय न्यायाधीश आले होते. सातोद रस्त्यावरील गोळीबार टेकडी जवळ असलेली जागेची त्यांनी न्यायालया करीता पाहणी केली. या जागेवर न्यायालय संदर्भात चा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. या सातोद रस्त्यावर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असून आता पुढे न्यायालय होणार काय याकडे शहराचे लक्ष लागले आहे. शहरातील सातोद रस्त्याला लागून गोळीबार टेकडी आहे. या टेकडी जवळ काही भूखंड हा क्रीडांगणासाठी राखीव असून त्यालाच लागून गट क्रमांक 2179 आहे याचे सुमारे दोन हेक्टरहून अधिक क्षेत्र आहे. या क्षेत्रावर नियोजित न्यायालयाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या.सानप यांनी जागेची पाहणी केली. यावेळी यावल प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश डी.जी. जगताप, तहसीलदार जितेंद्र कुवर, भुमिअभिलेखचे उपअधीक्षक जगताप सह अधिकारी वर्गाची उपस्थिती होती.