यावलमध्ये बंद घर फोडले ; 80 हजारांचा ऐवज लंपास

0

यावल- घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी 80 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. रविवारी दोन वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. शहरातील भुसावळ रस्त्याला लागून असलेल्या माधवनगरातील रहिवासी जितेंद्र गोकुळ चौधरी यांच्या घरी घरफोडी झाली. ते त्यांच्या मुळ गावी टाकरखेडा, ता. यावल येथे गेले होते तसेच त्यांच्या पत्नीही माहेरी गेल्याने घराला कुलूप होते. चोरट्यांनी 15 हजारांची रोकड, एक सोन्याची अंगठी आणि इतर सोन्याचे दागिने आदी मिळून अंदाजे 80 हजारांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, हवालदार संजय तायडे, गोरख पाटील, सुशील घुगे, गणेश मनुरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले असून पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.