यावलमध्ये मालवाहू गाडी भरल्याचा जाब विचारल्याने मारहाण : सहा जणांविरोधात गुन्हा

यावल : मालवाहू गाडीचा नंबर असताना दुसर्‍याने भरून नेण्याचा प्रयत्न केला व याचा जाब विचारल्याचा राग आल्याने एकास सहा जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवार, 16 नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी यावल पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा संशयीतांविरोधात गुन्हा
संतोष सुपडू बारी यांनी मंगळवार, 16 नोव्हेंबर रोजी शहरातील विश्वास ट्रेडर्स समोर मालवाहू गाडीचा नंबर लावला मात्र ते नाश्ता करण्यासाठी निघून गेल्यानंतर संशयीत आरोपी चेतन सुभाष बारी यांनी त्यांच्या मालवाहु वाहनाने माल भरून नेण्याचा प्रयत्न केला. याबाबत संतोष सुपडू बारी यांनी चेतन बारी यांना विचारणा केली असता त्याचा राग आल्याने फिर्यादी संतोष बारी यांना संशयीत आरोपी चेतन सुभाष बारी, आकाश सुभाष बारी, सुभाष लक्ष्मण बारी, प्रल्हाद लक्ष्मण बारी, संजय लक्ष्मण बारी व सचिन प्रल्हाद बारी यांनी शिवीगाळ करून जबर मारहाण केली. यात संतोष सुपडू बारी यांना गंभीर दुखापती झाल्याने उपचाराकामी त्यांना जळगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून वरील सहा संशयीत आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास हवालदार असलम खान हे करीत आहेत.