यावलमध्ये मुख्याध्यापकांची आत्महत्या
आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात : यावल पोलिसांनी केली अकस्मात मृत्यूची नोंद
यावल : शहरातील श्री स्वामी समर्थ नगर मधील रहिवासी एका 36 वर्षीय मुख्याध्यापकांनी बुधवार, 15 रोजी सकाळी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशाल बाबूराव गवळी असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मयत जि.प.शाळेत मुख्याध्यापक
शहरातील विस्तारीत भागात श्री स्वामी समर्थ नगरात विशाल बाबुराव गवळी (36, मूळ रहिवासी दहिवद, ता.शिरपूर) हे वास्तव्यास होते. टेंभी, ता.यावल येथील जिल्हा परीषद शाळेत मुख्याध्यापक असलेले गवळी हे गेल्या दहा वर्षापासून ते यावल तालुक्यात शिक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या आठवड्यात त्यांच्या सासर्यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांची पत्नी नंदुरबार येथे गेल्याने घरी ते एकटेच होते. घरात एकटे असलेल्या विशाल गवळी यांना बुधवारी सकाळी सात वाजता त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या लखीचंद पवार यांनी आवाज दिला मात्र घरातून काहीच प्रतिसाद न आल्यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता विशाल गवळी हे गळफास घेऊन मृतावस्थेत आढळून आले. मयत गवळी यांच्या कुटुंबाला तसेच यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. यावल पोलिसात लखीचंद पवार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत. मयत विशाल बाबुराव गवळी हे मूळचे दहिवद, ता.शिरपूरचे रहिवासी आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व सात वर्षांचा मुलगा आहे.