आत्महत्या करताना पोलिसांनी बाटली हिसकावली ; विषारी द्रव पोलिस ठाण्यात सांडले
यावल- शहरातील रहिवासी मो. फारूक मो.अब्दुल समद यांचा शहरातीलच सैय्यद अशपाक सय्यद निसार यांच्याशी पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाल्यानंतर मो.फारूक मो.अब्दुल समद यांनी यावल पोलिस ठाणे गाठले. ठाणे अंमलदार संजीव चौधरी यांच्याकडे ते तक्रार नोंदवत असतानाच तक्रारदाराने सोबत आणलेली विषाची बाटली काढून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र पोलिसांना ही बाब कळताच त्यांनी बाटली ओढल्याने पोलिस ठाण्यातही द्रव सांडले गेले. बुधवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने यावल शहरात खळबळ उडाली आहे तर शहरातील बेकायदा व्याज विक्रीचा व्यवसाय करणारेदेखील पोलिसांच्या रडारवर आले असून त्या दृष्टीने त्यांच्यावरील कारवाईकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.
प्रकृती खालावल्याने जळगावात हलवले
मो.फारूक मो.अब्दुल समद यांनी आत्महत्येचा प्रयत्न करतानाच काही विष त्यांच्या पोटात गेल्यानंतर त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. डॉ.परवीन तडवी, सरला परदेशी, डॉ.उमेश कवडीवाले यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करीत प्रकृती खालवल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवले. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी, पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर आदींनी पंचनामा केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सदर वाद विवाद हे व्याजाच्या पैशातून झाल्याची चर्चा आहे तर या प्रकरणी हवालदार संजीव चौधरी यांच्या फिर्यादीवरून मो.फारूक यांच्याविरुद्ध भादवि कलम 309 नुसार आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गोरख पाटील करीत आहेत.