यावलमध्ये स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळले

0

‘नकोशी’ बालिकेच्या मातेचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे आव्हान !

यावल : भुसावळ रस्त्यावरील पेट्रोलपंपा काही अंतरावर शुक्रवारी सायंकाळी मजूर महिलांना तीन दिवसीय वय असलेल्या स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. नकोशी असलेल्या या बालिकेच्या मातेचा शोध घेण्याचे आवाहन आता यावल पोलिसांपुढे असून त्या मातेविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांना आढळले अर्भक
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता महिला मजूर मंगला विष्णू पारधे, मायाबाई तायडे, गंगुबाई गजरे आदी यावल शहरात येत असतानाच रस्त्याच्या कडेला काटेरी झुडूपातून एका बालकाचा रडण्याचा आवाज येत असल्याने महिलांनी डोकावल्यानंतर त्यांना नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळले. मंगलाबाई विष्णू पारधे यांनी अर्भकास बाहेर काढत यावल पोलिसांना माहिती देऊन येथील ग्रामीण रूग्णालयात त्या बालकास दाखल केले. या बालिकेच्या अंगावर जखमा झाल्या असून वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, अधिपरिचारीका मंजूषा कोळेकर आदींनी प्रथमोपचार केले तर मंगला पारधेे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात महिलेविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या नवजात शिशुला पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.