यावलला अन्नत्याग आंदोलनासह संकल्प अभियानाची सुरुवात ; कर्जमाफीसाठी निघाली रथयात्रा

0

यावल:- पंचायत समितीच्या कार्यालयासमोर शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेडच्या वतीने देशातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या 32 वर्षपुर्ती निमित्त मृत शेतकरी कुटुंबीयांच्या पुण्यस्मरणानिमित्त एक दिवशीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले तर संभाजी ब्रिगेडकडून स्वराज्य संकल्प अभियानाची सुरवात करण्यात आली. त्यानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात विनाअट शेतकर्‍यांना कर्ज माफी सह विविध मागण्यांसाठी रथयात्रा निघाली आहे.

यांचा होता सहभाग
देशातील पहिली शेतकरी सामूहिक आत्महत्या 19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (जि.यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे, त्यांची पत्नी मालती व चार मुलांनी पवनार जवळील दत्तपूर येथे जाऊन आत्महत्या केली होती. ही पहिली शेतकरी सामूहिक आत्महत्या मानली जाते. तेव्हापासुन ते आजवर लाखों शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. 19 मार्च रोजी या घटनेला 32 वर्ष पूर्ण होत असल्याने शेतकरी संघटनेचे खान्देश विभाग प्रमुख कडूअप्पा पाटील, तालुकाध्यक्ष विश्वासराव शांताराम पाटील, संभाजी ब्रिगेडचे जळगाव जिल्हा पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष संजीव हिरामण सोनवणे, प्रकाश पाटील, डॉ. अनिल पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विजय पाटील किनगावकर, अजय पाटील, तुषार उगले, पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत पाटील, दिनकर क्षिरसागर, अविनाश बाविस्कर, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष देवकांत पाटील, प्रकाश पाटील, संजय काकडे, मयुर पाटील, सीताराम पारधे, बी.डी.पाटील, चंद्रकांत चौधरीसह मोठ्या संख्येत नागरीक व शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटनेचे खान्देश विभाग प्रमुख यांनी बोलतांना म्हटले की, 32 वर्षात सातत्याने शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. आपण या देशाचे नागरिक म्हणून काय करू शकतो? म्हणून किमान एक दिवस शेतकरी करीता उपोषण व अन्नदात्यासाठी पुढे आले पाहिजे तर शासनाने घटना दुरूस्ती केल्याने शेतकर्‍यांच्या खर्‍या अर्थाने अडचणी वाढल्याचे ते म्हणाले.

संभाजी ब्रिगेड आक्रमक
यावेळी शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकरीता संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वराज्य संकल्प अभियान रथाची सुरुवातदेखील करण्यात आली त्या प्रसंगी बोलतांना ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संजीव सोनवणे यांनी काँग्रेसच्या पंज्याचे सरकार शेतकरीस मारक होते तर आता हे भाजपचे सरकार शब्द पाळत नाहीये यासह अत्यंत शेलक्या शब्दात केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणा दिल्या.