नोकरी सोडून राजकारण करण्याचा कनिष्ठ अभियंत्यांना हरीभाऊ जावळेंचा टोला
यावल- दोन दिवसांपूर्वीच आढावा बैठकीत आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पाणीपुरवठा विभागाचे वाभाडे काढल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी आमदार हरीभाऊ जावळे यांनी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत चुकीची माहिती देणार्या कनिष्ठ अभियंता आय.वाय.पाटील यांना फटकारत नोकरी सोडून राजकारणात येण्याचा सल्लाही दिला. पाटील यांच्या कामकाजाबाबत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढून खडे बोलही सुनावले.
आमदारांकडून कामकाजाचा आढावा
पंचायत समितीमध्ये सोमवारी पंचायत समितीच्या विविध विभागांतर्गत कामकाजा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. पंचायत समितीच्या सेस फंडातून तसेच लोकप्रतिनिधीच्या फंडातून केल्या जाणार्या कामासंदर्भात नागरीकांमध्ये चुकीची माहिती देणारे कनिष्ठ अभियंता आय. वाय. पाटील यांच्या संदर्भात उपस्थित पंचायत समिती सदस्यांनी तक्रारी केल्यानंतर आमदारांनीदेखील आपल्या निधीतून केलेल्या कामाच्या ठिकाणी बोर्ड लावण्याबद्दल त्यांना विचारणा केली. पाटील हे नागरीकांना हा निधी शासनाचा असल्याचे सांगून लोकप्रतिनिधींचा त्याच्याशी काय संबंध? असे सांगून राजकारण करीत असल्याचे तक्रार झाल्यानंतर आमदारांनी त्यांची खरडपट्टी काढत नोकरी सोडून राजकारणात येण्याचा सल्ला दिला. मीदेखील राजकारण असून केवळ निवडणुकीपुरता राजकारण करतो मात्र नंतर समाजकारण करतो, असे सांगण्यासही आमदार विसरले नाहीत. बैठकीला पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, जिल्हा परीषद सदस्य सविता भालेराव, नंदा सपकाळे, पंचायत समितीचे सदस्य दीपक पाटील, योगेश भंगाळे, भाजपाचे, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. गटविकास अधिकारी किशोर सपकाळे तसेच सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.