शहरात तणावपूर्ण शांतता
यावल– शहरात गुरुवारी रात्री साडेआठ चे सुमारास नगीना मस्जिद चौकात होळीचा दांडा ( ऐरंडीचे झाड ) घेऊन जाणाऱ्या उत्साही कार्यकर्त्यांना एका गटाने मारहाण केल्याची घटना घडली. यावेळी तुरळक दगडफेक झाल्याचे समजते. दरम्यान या मारहाणीत एका गटाकडील मनोज सुनिल इंगळे ( वय १८ ), हर्षल नंदकिशोर भोईटे ( वय १८ ), व ज्ञानेश्वर ललित देवरे ( वय १७ ) या तीन युवकांना जबर मुक्का मार लागला आहे. त्यामुळे दोन्ही गटातील जनसमुदाय रस्त्यावर उतरल्यामुळे शहरात बुरुज चौक ते संभाजी पेठ भागात काही काळ तणावग्रस्त परिस्थिती होती. होळी बंदोबस्तामुळे तालुक्यात विविध ठिकाणी बंदोबस्त प्रकरणी पोलिस व्यस्त असल्यामुळे तोकड्या पोलिस बंदोबस्तात जमावावर नियंत्रण मिळविण्यात आले. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे व पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी भेट देऊन जमाव शांत केला. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शहरात यापूर्वी दिवाळीच्या काळात दुकानाचे ओट्यावर फटाके उडविण्याच्या कारणावरून असाच तणावाचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर शहरात अती संवेदनशिल भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अपेक्षित असतांना ‘ याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या शिवजयंती, होळी व आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात न आल्याने काही शांतता समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.