31 निसर्गप्रेमींचा समावेश ; 24 तास वनरक्षकांची टेहळणी
यावल- बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून सातपुड्यातील यावल वन्यजीव अभयारण्यात शनिवार, 18 रोजी वन्यप्राण्यांची गणना केली जात असून त्यासाठी यावल शहरातून 15 तर जळगावहून 16 असे 31 निसर्गप्रेमी ही गणना करणार आहे. जामन्या वनक्षेत्रात 25 तर पाल वनक्षेत्रात 20 ठिकाणी झाडांवर मचाणी बांधण्यात आल्या असून 24 तास टेहाळणीसाठी वनरक्षक नेमण्यात आले आहेत.
प्राणी गणनेची सर्वांना उत्सुकता
यावल वन्यजीव अभयारण्यात दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात येते. त्यासाठी पाल 20 व जामन्या परीक्षेत्रात 24 एकूण 45 ठिकाणी प्रामुख्याने पाणवठ्यांच्या परिसरात मचाणी बांधण्यात आल्या आहेत. चार वर्षांपूर्वी जामन्या व पाल वन क्षेत्रातून सुमारे 600 हेक्टरवरील अतिक्रमण काढले होते. या भागात कुरण विकासाचे बर्यापैकी प्रयत्न झाले. तसेच ठिकठिकाणी फळझाडे लावण्यात आली. यामुळे पशुपक्षी-वनप्राण्यांचा अधिवास पुन्हा बहरला आहे. त्यातही गेल्या वर्षी सातपुड्यात पट्टेदार वाघाच्या जोडीचेे झालेले दर्शन पाहता यंदाच्या प्राणी गणनेची सर्वांना उत्सुकता आहे. शनिवारच्या गणनेसाठी यावल शहरातून 15 तर जळगावातून वन्यजीव संरक्षण संस्थेच्या 16 जणांच्या एका पथकाने नोंदणी केली आहे. मचाण उभारून प्राणी गणनेसाठी यावल वन्यजीवचे प्रभारी सहायक वनसंरक्षक रमाकांत भवर, जामन्या वनक्षेत्रपाल अक्षय मेत्रे, पाल वनक्षेत्रपाल राजेश पवार व कर्मचारी मेहनत घेत आहेत.