यावल अभयारण्यात वाघाचे दर्शन तर मुक्ताईनगरात मात्र नुसत्याच डरकाळ्या

0

मुक्ताईनगर- बुद्धपौर्णिमेनिमित्त यावल अभयारण्यासह मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा व मुक्ताईनगर वनपरीक्षेत्रात झालेल्या प्राणिगणनेत यावल तालुक्यात व्याघ्रदर्शन झाले असलेतरी मुक्ताईनगर तालुक्यात मात्र डरकाळ्यांनी समाधान मानावे लागले. मुक्ताईनगर वनपरीक्षेत्रात मात्र एकही बिबट्या आढळून आला नाही हेदेखील विशेष !

चितळ, माकडासह विविध प्राण्यांचे दर्शन
वढोदा वनपरीक्षेत्रात 10 ठिकाणी मचाण व मुक्ताईनगर वनपरीक्षेत्रात 6 ठिकाणी मचाण बांधण्यात आल्या. पट्टेदार वाघाचे गतवैभव असलेल्या विशेष म्हणजे वढोदा वनपरीरक्षेत्रातील जंगलातील पाणवठ्यावर एकही पट्टेदार वाघ दिसून आला नसलातरी वढोदा वनपरीक्षेत्रातील दक्षिण डोलारखेडा नवीन पाणवठ्याजवळील मचाणीवर रविवारी पहाटे 5 वाजुन 10 मिनिटांनी वाघाची डरकाळी ऐकू आली तर दक्षिण डोलारखेडा पूर्णा नदीकाठाजवळील मचाणीवर देखील रविवारी पहाटे 4 वाजुन 56 मिनिटांनी वाघाची डरकाळी ऐकु आली होती तर वढोदा व मुक्ताईनगर वनपरीक्षेत्रात एकही बिबट्या दिसुन आला नाही. असे असलेतरी वढोदा वनपरीक्षेत्रात वढोदा, कुर्‍हा, चारठाणा, डोलारखेडा या बीटमधील 10 मचाणीवर उपस्थितांना चितळ, माकड, रानडुक्कर, रानमांजर, अस्वल, मोर, चिंकारा, निलगाय हे प्राणी दिसुन आले. मुक्ताईनगर वनपरीरक्षेत्रात रूईखेडा, बोदवड, कुर्‍हेपानाचे, गोळेगाव या बीटमध्ये सहा मचाणी होत्या. येथे रानडुक्कर, नीलगाय, मोर, रानमांजर हे प्राणी दिसुन आलेत.

व्याघ्रदर्शनासह बिबट्याचा वावर
बुद्धपोर्णिमेच्या दिवशी यावल अभयारण्यात वनप्राण्यांची प्र-गणना झाली. त्यात प्राणी गणनेकरीता पाल येथे 20 व जामन्या परिक्षेत्रात 17 अशा 37 ठिकाणी मचाणी उभारण्यात आल्या. पाल वनक्षेत्रातील बोरघाट परीसरातील सुकी नदीवर पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघाचे दर्शन हुसेन तडवी या तरूणास रात्री दीड वाजेच्या सुमारास झाले. गेल्या वर्षी वाघाची जोडी दिसून आली होती त्यामुळे वाघांचा अधिवास असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.