यावल आगारातही बस सेवा ठप्प

यावल : संप काळातच यावल आगारात बस घेऊन आलेल्या रावेर आगारातील चालक-वाहकांचे कर्मचार्‍यांनी गळ्यात हार टाकून, तसेच हातात बांगड्या घालून रविवारी स्वागत केले. बस घेऊन येणारे चालक, वाहक रावेर आगारातील होते. आपण रावेर आगारात जाऊन संपात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले मात्र यावल आगाराच्या कर्मचार्‍यांनी त्यांचे असे स्वागत केल्याने त्यांनी यावलमध्येच थांबून संपात सहभाग नोंदवला. एसटी बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेक प्रवाशांनी मिळेल त्या वाहनांद्वारे पुढील प्रवास केला. सर्व कर्मचार्‍यांनी एकत्र येत पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व आगार व्यवस्थापक एस.व्ही.भालेराव यांच्याकडे निवेदन दिले. रविवारी दुपारी एक वाजेपासून यावल आगारातील बससेवा ठप्प झाली. अचानक बससेवा बंद झाल्याने बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले तसेच बाहेरून आलेल्या काही बसेसदेखील या ठिकाणी लावून इतर आगारातील कर्मचारीदेखील या कर्मचार्‍यांच्या संपात सहभागी झाले. बसस्थानकावर जमलेल्या प्रवाशांनी मिळेल त्या वाहनांद्वारे प्रवास केला. राज्य परीवहन मंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण होईपर्यंत संप चालू राहील, असे निवेदन यावल आगारातील सर्व कर्मचार्‍यांनी दिले.