यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेल्या अतिरिक्त खर्चास आक्षेप

0

नगरसेवक अतुल पाटील यांची तक्रार : मंजूर तरतुदीपेक्षा पैशांची उधळपट्टी अधिक

यावल- कृषी उत्पन्न बाजार समितीने सन 2017-18 च्या अर्थसंकल्पातील मंजूर तरतुदीपेक्षा अतिरिक्त खर्च करून समितीच्या पैशाची उधळपट्टी केल्याचे पूर्व विनियोजन पत्रकावरून लक्षात येत असल्याने न.पा. प्रतिनिधी अतुल वसंतराव पाटील यांनी आक्षेप नोंदवून विरोध दर्शविला आहे. बाजार समितीच्या 1 जूनच्या रोजीच्या मासिक सभेत विषय क्रमांक 7 हा 2017-18 च्या बजेट पेक्षा जास्त झालेल्या खर्चाच्या पूर्नविनियोजन पत्रकास मंजुरी देऊन नोंद घेणे असा होता परंतु या वेळेस सभेमध्ये संचालक म्हणून माझ्या समोर कुठलेही पूर्नविनियोजन पत्र सादर करण्यात आलेले नव्हते याची नोंद घ्यावी, असा आपला आग्रह होता त्यानुषंगाने दिनांक 8 जून रोजी पूर्नविनियोजन पत्राची नक्कल मागवुन अवलोकन केले असता समितीने 2017-18च्या अर्थसंकल्पात मंजूर तरतुदीपेक्षा अतिरिक्त खर्च करून पैशाची उधळपट्टी झाल्याचे अतुल पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मंजुरी पेक्षा 26 लाख 10 हजार 243 रुपयांचा अतिरिक्त झाला खर्च
सभापती, उपसभापती, सदस्य प्रवासखर्च व भत्ता मंजूर तरतुदीपेक्षा 4लाख 48 हजार 593 रुपये, प्रशासकीय खर्च मंजूर तरतुदीपेक्षा 13 लाख55 हजार 684, मुख्य व उपबाजार आवार संरक्षण, देखभाल, दुरुस्ती, वृक्ष रोपण, संरक्षण जाळी, कुंपण अशा कामांसाठी मंजूर तरतुदीपेक्षा जास्तीचा खर्च करण्यात आला आहे. शेतकरी हिताच्या बाजार समितीत काटकसरीने खर्च करणे अपेक्षित असतांना अशा प्रकारे शेतकर्‍यांच्या पैशांची उधळपट्टी करणे चुकीचेच असल्याचे नगरसेवक तथा कृउबा संचालक अतुल पाटील म्हणाले.