यावल ग्रामीण रुग्णालयातील अपहार : वैद्यकीय अधीक्षकांसह तिघांचे निलंबन

यावल :  यावल ग्रामीण रुग्णालयात तब्बल आठ ते दहा कोटींच्या साहित्य खरेदीसाठी निविदा प्रकिया न राबवताच रकमेच्या अपहारप्रकरणी आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, अभिलेखापाल अणि लेखा अधीक्षकांना निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह आणखी दहा अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अपहाराची व्याप्ती कोटींमध्ये
यावलसह दहा ते बारा ग्रामीण रुग्णालयांसाठी तब्बल आठ ते दहा कोटींची खरेदी प्रकिया राबवण्यात आली. निविदा प्रक्रिया न राबवता थेट संबंधित संस्थेने परस्पर देयके काढून घेतल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी जळगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक सुधाकर दगडू चोपडे यांच्यासह अभिलेखापाल मिलिंद निवृत्ती काळे व लेखा अधीक्षक हरिपाठ वाणी यांना निलंबित करण्यात आले.

अहवालात या गंभीर बाबी झाल्या उघड
2021-22 मध्ये स्वच्छता साहित्य, खासगी स्टेशनरी, डांबर गोळी, उंदिर निर्मूलन गोळ्या, इमर्जन्सी लॅम्प, नित्योपयोगी किरकोळ साहित्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात ग्रामीण रुग्णालय रावेर, मेहुणबारे, यावल या आरोग्य संस्थांसाठी वित्तीय अधिकार नसताना व सक्षम अधिकार्‍यांच्या मंजुरी आदेशाशिवाय करण्यात आली. 10 कोटी 67 लाखांची ही खरेदी करताना वित्त विभागाच्या मर्यादा तरतुदी व प्राधिकरणाचे पालन करण्यात आले नाही.

अपहाराची व्याप्ती 30 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता
पुणे येथील महालेखापाल विभागाने जळगावला जाऊन प्रत्यक्ष केलेल्या चौकशीत 8 ते 10 कोटींचा वाटत असलेला हा घोटाळा 30 ते 35 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक चोपडे हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले. परंतु, त्याच्या आदल्या दिवशीच 29 जूनला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.