यावल तहसीलच्या अव्वल कारकुनांना मारहाण : तिघांविरोधात गुन्हा

यावल : यावल पोलीस ठाण्यासह न्यायालयात तक्रार केल्याच्या कारणावरून यावल तहसील कार्यालयातील अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी यांना शिविगाळ करीत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावलचे अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घराजवळील सुभान समशेर तडवी व त्यांचे कुटुंबात वाद सुरू असून याबाबत न्यायालयात खटला न्यायप्रवीष्ट आहे. बुधवार, 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास दुचाकीने सुभान जमशेर तडवी यांच्या घरासमोरून जात असताना सुभान तडवी, जैतून सुभान तडवी व त्यांचा मुलगा तसलीम सुभान तडवी यांनी आपल्यास शिविगाळ करीत दगड मारून फेकला. आमच्याविरोधात खोट्या तक्रारी करतात, तुम्हाला आम्ही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. जैतून सुभान तडवी यांनी पायातील चप्पलने आपल्यास मारहाण केली व सुभान तडवी यांनी काठीने पाठीवर तसेच डाव्या हाताच्या खांद्यावर मारल्याने मुका मार लागला. या प्रकरणी यावल पोलिसात सुभान जमशेर तडवी, जैतून सुभान तडवी व तस्लीम सुभान तडवी (लोकेशनगर, यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. तपास यावल निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नेताजी वंजारी करीत आहेत.