यावल : तालुक्यातील किनगावात एका सेतु सुविधा केंद्र चालकाने थेट यावल तहसीलदारांचे पीएम किसानचे खाते हॅक करीत तब्बल 38 जणांची नोंदी केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासुन तहसील कार्यालयात पीएम किशान संदर्भातील नोंदी थांबवण्यात आल्या होत्या व तरीदेखील 38 नोंदी झाल्या कशा? याबाबत जिल्हाधिकार्यांनी संशय व्यक्त केला व हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ललित नारायण वाघ (रा.किनगाव, ता.यावल) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
संकेतस्थळ हॅक करीत केल्या नोंदी
यावल तहसील कार्यालयातील लिपीक दीपक शांताराम बाविस्कर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. गेल्या तीन वर्षांपासून तहसील कार्यालयात त्यांच्याकडे महसुल सहाय्यक म्हणुन कामकाज आहे व त्या अनुषंगाने ते मागील दोन वर्षापासून पी.एम.किसान सन्मान निधी योजनेचे कामकाज पाहत आहेत. या योजनेत शेतकर्यांची नोंदी करणे (रजिस्ट्रेशन), आधारकार्ड वरील नाव दुरुस्ती करणे, चुकीचा खाते क्रमांक असल्यास ते दुरुस्त करणे, शेतकर्यांचे शिवार बदल करणे आदी कामे ते ऑनलाइन पी.एम. किशानच्या संगणकीय संकेतस्थळावर तहसीलदारांच्या आदेशाने करत होते मात्र दिनांक 14 ते 30 सप्टेंबर या कालावधी तहसीलदार महेश पवार यांच्या सुचने वरून त्यांनी काम बंद ठेवले होते व संकेतस्थळाचे लॉगीन व आयडी त्यांना तहसीलदार महेश पवार यांच्या परवानगीनेच उपलब्ध व्हायचे म्हणून ते देखील बंद होते. दरम्यान 14 ते 30 सप्टेंबर दरम्यान नोंदणी बंद असतांना या पीएम किसान संकेतस्थळावर 38 शेतकर्यांची नोंदणी झाल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निदर्शनास आले व त्यांनी याबाबत थेट तहसीलदार महेश पवार यांना विचारणा केली. तहसीलदारांच्या लॉगीन आय.डी. या पोर्टल वर परवानगी शिवाय संकेतस्थळ हँक करून संशयीत ललित नारायण वाघ (रा.किनगाव, ता.यावल) यांना कोणतेही अधिकार नसतांना 38 शेतकर्यांच्या नोंदी टाकल्याचे समोर आले व या प्रकरणी आयटी अँक्ट सह विविध कलमान्वये ललित वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार करीत आहेत.
आधी पण नोंदी केल्याचा संशय
यावल तालुक्यात पैसे घेवून पी.एम.किसानच्या नोंदी केल्या जात असल्याच्या तक्रारी असल्याने आपण कर्मचार्यांवर संतप्त होत काम सद्या बंद ठेवण्याच्या सूचना केल्या मात्र 38 नोंदी झाल्याचे समोर आले व नोंदणी केलेल्या शेतकर्यांना बोलावून त्यांचे जवाब घेतले असता नोंदणी करीता किनगाव सेतु केंद्रात प्रत्येकी एक हजार रुपये घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तर बाहेरील व्यक्ती करीत असलेल्या गैरप्रकारात महसूल प्रशासन बदनाम झाले, असे तहसीलदार महेश पवार यांनी सांगितले.