यावल : यावल तहसील कार्यालयातील अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी (56) याला बुधवारी एसीबीने यावल तहसील कार्यालयात अवघ्या पाचशे रुपयांची लाच घेताना पकडले होते. संशयीताला न्यायालयाने 18 जूनपर्यंत दोन दिवसांची पोलिस सुनावली होती. दरम्यान, ट्रॅप झाला त्यावेळी कार्यालयात हजर असलेले यावलचे तहसीलदार महेश पवार कारकून सुरज जाधव व नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांना एसीबीने शुक्रवारी हजर राहण्याच्या सूचना केल्यानंतर तिघांनी सकाळी 11 ते दोन या वेळेत एसीबीत हजेरी लावत आपला जवाब नोंदवला आहे. आपला या प्रकाराशी काहीही संबंध नसल्याचा जवाब उभयंतांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आज संपणार पोलिस कोठडी
जळगाव एसीबी कार्यालयात तहसीलदारांसह तिघांचे स्वतंत्र जवाब नोंदवून घेण्यात आले. तहसीलदारांच्या अखत्यारीत संशयीत काम करीत असल्याने त्यांना घडल्या बाबीची विचारणा करण्यात आली होती तर ट्रॅप झाला त्यावेळी सुरज जाधव व आर.डी.पाटील हे साक्षीदार समोर असल्याने त्यांनाही विचारणा करण्यात आली मात्र त्यांनीही लेखी जवाबात आपला या प्रकाराशी संबंध नसल्याचे सांगितले. दरम्यान, आरोपी मुक्तार तडवी यांच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपणार असल्याने पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपास पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग पाटील करीत आहेत.