यावल तहसीलमधील अव्वल कारकून जळगाव एसीबीच्या जाळ्यात

0

शेतीचा अर्धा हिस्सा नावावर करण्यासाठी मागितली होती 15 हजारांची लाच ; जिल्ह्यात लाचखोरांवर सलग दुसर्‍या दिवशी कारवाई

यावल- जातीचा दाखला देण्यासाठी दिड लाखांची लाच घेणार्‍या फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदारांच्या अटकेला 24 तास पूर्ण होत नाही तोच यावल तहसील कार्यालयातील अव्वल कारकूनानेही शेतीचा अर्धा हिस्सा नावावर करण्याच्या प्रकरणात 15 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी त्यास अटक केली. विजय पुंडलिक पाटील (44, सुयोग कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

15 हजारांच्या लाचेच्या मागणीप्रकरणी आवळल्या मुसक्या
लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत स्त्रियांचे हक्क सुरक्षित राहण्यासाठी निघालेल्या योजनेत शेतीचा अर्धा हिस्सा पत्नीच्या नावावर सुरक्षित ठेवण्यासाठी यावल तालुक्यातील तक्रारदाराने तहसील कार्यालयात प्रकरण सादर केले होते. हे काम करून देण्याच्या मागणीसाठी आरोपी तथा अव्वल कारकून विजय पाटील याने 15 हजारांची लाच 6 ऑगस्ट 2018 रोजी मागितली होती. एसीबीच्या तपासात ही बाब स्पष्ट झाल्याने 5 ऑक्टोबर रोजी आरोपीविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीला अटक केली.