यावल- जात प्रमाणपत्रासह अतिक्रमण व अन्य कारणांच्या तक्रारीमुळे यावल तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांना अपात्रतेचा फटका बसल्याने ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सहा सदस्यांनी विहित मुदतीत जात वैद्यता प्रमाणपत्र सादर न केल्याने तर एका सदस्याला अतिक्रमण केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले. राखीव जागेवर निवडून आलेेल्या उमेदवारांना एक वर्षाआत जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असतानाही काही सदस्यांनी प्रमाणपत्र सादर न केल्याच्या तक्रारी होत्या शिवाय तालुक्यातील कासवे या ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांनी प्रमाणपत्र सादर न केल्याने मधुकर सपकाळे यांनी तक्रार केली होती तसेच गावाचे प्रभारी सरपंच तथा उपसरपंच पंढरीनाथ बारकू सपकाळे यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करीत अतिक्रमण केल्याची तक्रार दशरथ सपकाळे यांनी केल्यानंतर जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी सात सदस्यांना अपात्र ठरवले आहे. त्यातील कासवेचे पंढरीनाथ सपकाळे, दशरथ अर्जुन सपकाळे, आशा शंकर सपकाळे व मंगला विनोद तायडे तसेच अट्रावलचे दीपक सोमा तायडे, अंजाळेच्या उषा बाबूराव सोनवणे, न्हावीचे जावेद नवाब तडवी यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.