यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला सिनेस्टाईल पळवले : दोघांविरोधात गुन्हा

यावल : खंडोबा यात्रोत्सव पाहण्यासाठी आलेल्या मुलीला भावासह नातेवाईकांसमोरूनच दोघा संशयीतांनी दुचाकीवरून पळवून नेले. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भर दुपारच्या घटनेने खळबळ
यावल तालुक्यातील एका गावात राहणारी मुलगी ही कुटुंबियांसह वास्तव्याला असून फैजपूर येथे खंडोबा यात्रोत्सवानिमित्त मुलगी, तिचा भाऊ आणि नातेवाईक असे तिघे रविवार, 20 मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आले होते. दरम्यान दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पीडीत मुलीसह तिचा भाऊ आणि नातेवाईक असे जिघे घरी जात असताना संशयीत आरोपी जीवन अशोक भालेराव (भालोद, ता.यावल) व आकाश संजय भागेश्वर (सावदा, ता.रावेर) हे दुचाकीवर आले व त्यांनी मुलीच्या भावाला व नातेवाईकाला धक्का देत मुलीला सोडले नाही तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत पीडीत मुलीला दुचाकीवरून पळवून नेले.

फैजपूर पोलिसात गुन्हा
याबाबत दोघांनी लागलीच फैजपूर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी जीवन अशोक भालेराव (भालोद, ता.यावल) आणि आकाश संजय भागेश्वर (रा.सावदा, ता.रावेर) यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहे.