यावल। येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातून जिल्हाभरातील आदिवासी बांधवांना ‘शबरी आवास योजने’तून घरकुलाचा लाभ दिला जातो. यंदा या योजनेतून 1382 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. पैकी 1023 घरकुलांची कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत.
जिल्ह्याभरातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी यावल प्रकल्प कार्यालयाकडून शबरी पारधी आवास योजना राबवली जाते. या दोन्ही योजनांतून जिल्ह्यात 1382 लाभार्थ्यांची निवड त्या-त्या तालुक्यातील पंचायत समितीकडून करण्यात आली होती.
359 कामे सुरू करण्याचे आदेश
ग्रामसभेच्या मंजुरीचे प्रस्ताव कार्यालयाकडून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठवले होते. त्यानुसार निवड झालेल्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी तीन टप्प्यात अनुदान मिळेल. यानुसार 1023 घरकुलांची कामे वेगाने सुरू असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याची रक्कम वितरित झाली आहे. यामुळे दोन वर्षांपासून रंगाळेली योजना रूळावर आली आहे. उवर्रित 359 कामे सुरू करण्याचे आदेश निघाले आहेत. पूर्वीयोजना प्रकल्प कार्यालयाकडून राबवण्यात येत होती. आता मात्र प्रकल्प कार्यालयात अर्ज केल्यावर पंचायत समितीकडून त्याची पडताळणी केली जाते. ग्रामसभेच्या ठरावानंतर लाभार्थी निवड होते, जिल्हा ग्रामीण यंत्रणेकडून प्रत्यक्ष अंमलबजावणी होते. योजनेची संपूर्ण रक्कम राज्य व्यवस्थापन कक्षाकडे प्रकल्पाकडून देण्यात येते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या देखरेखीत घरकुलाच्या कामाच्या प्रगतीनुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी वर्ग केला जातो. यामुळे पारदर्शकता येते.