यावल तालुक्यातील विरावली रस्त्यावर दुचाकी धडकल्या : तिघे तरुण गंभीर

यावल : यावल तालुक्यातील विरावली रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात तीन तरुण गंभीर जखमी झाले. तिघांवर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथमोपचार करीत जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला. जखमी दोन तरूण यावल तर एक चिखली खुर्द येथील आहे.

भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळल्या
यावल शहरातील बाबूजी पुरा भागातील रहिवासी साहिल शेख मो.हनीफ (२४) हा तरुण शुक्रवारी दहिगाव येथे कामाला गेला होता. सायंकाळी साडेसात वाजता तो दहिगाव येथून दुचाकीद्वारे आपल्यासोबत शेख रेहान शेख शरीफ (१५, रा. खिर्णीपुरा, यावल) याला घेऊन यावल शहरात येत होता. दरम्यान साडेसात वाजेच्या सुमारास विरावली गावाजवळ यावलकडून विरावलीकडे दुचाकी घेवुन मोहन तापीराम थोरात (१९) हा तरुण जात असताना अचानक या दोघांच्या दुचाकींची समोरासमोर धडक झाली व तिघे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतील तिघांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये आणण्यात आले येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी. बी. बारेला, अधिपरीचारिका नेपाली भोळे, परीचारक जॉन्सन चोरटे, पिंटू बागुल आदींनी प्रथम उपचार केले मात्र तिघांची प्रकृती गंभीर असल्याने तिघांना पुढील उपचाराकरीता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. हा अपघात कसा झाला हे मात्र समजू शकले नाही.