यावल तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात धाडसत्र : पाच संशयीत जाळ्यात

यावल : अवैध धंदे चालकांची पोलिसांच्या कारवाईमुळे झोप उडाली आहे. यावल पोलिसांकडून शहर व परीसरात सातत्याने होत असलेल्या कारवाईचा जुगार्‍यांसह अवैध धंदे चालकांनी धसका घेतला आहे. डोंगरकठोर येथे दोन गावठी दारू विक्रेत्यांवर तर सट्टा-जुगार खेळविणार्‍या तिघांवर कारवाई करण्यात आली व पाच संशयीतांना अटक करण्यात आली.

कारवाईने उडाली खळबळ
प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधीक्षक व यावल ठाण्याचे प्रभारी आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलमखान, सुशील घुगे, राहुल चौधरी, राजेश वाडे यांच्या पथकाने डोंगरकोठारा येथील संतोष भीमराव सपकाळे याच्याकडून 750 रुपये किंमतीची 15 लिटर गावठी दारू, सुभाष त्र्यंबक काळे याच्याकडून 450 रुपये किंमतीची नऊ लिटर दारू जप्त करीत दोघांच्या मुसक्या बांधल्या तर बसस्थानक परीसरात सट्टा जुगार चालविणारे दिलीप भास्कर पाटील यांच्याकडून 430 रुपयांची रोकडसह सट्टा जुगाराची साधने तर अशोक वामन कोळी याच्याकडून 630 रुपयांची रोकड व सट्टा जुगाराची साधने आणि अरविंद सुरेश पाटील याच्याकडून 750 रपुयांची रोकडसह कल्याण मटका नावाच्या जुगाराची साधने जप्त करण्यात आली.पुढील तपास हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहेत.