आरक्षण सोडत जाहीर : माजी सैनिकांसह प्रकल्पग्रस्त व खेळाडूंनाही संधी
यावल- तालुक्यातील पाच गावांमध्ये महिलांचीही कोतवाल पदावर वर्णी लागणार आहे. मंगळवारी तहसीलदार कुंदन हिरे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षणात 30 टक्के जागा महिला राखीव, तर इतरांना सन 2011च्या जनगणनेच्या आधारावर आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षणासाठी चिठ्ठीची मदत घेण्यात आली. तालुक्यात एकुण 34 तलाठी सजे असून त्यातील 21 कार्यालयातील कोतवाल पद रिक्त आहे. या ठिकाणी भरतीसाठी मंगळवारी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. 21 पैकी 30 टक्के नियमानुसार पाच जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. सोबतच प्रकल्पग्रस्त, खेळाडू व माजी सैनिकासाठी प्रत्येकी एक जागा सर्वसाधारण ठिकाणी आरक्षित करण्यात आली. यानंतर महिलांच्या व इतर काही जागांसाठी इयत्ता सातवीची विद्यार्थिनी तेजस्विनी विलास चौधरी हिच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीद्वारे आरक्षण टाकण्यात आले. प्रभारी नायब तहसीलदार आर.बी.माळी, आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी आर.एस.साबळे, मंडळाधिकारी ई.व्ही.महाडीक, पी. ए. कडनोर, सचिन जगताप, आर.डी.पाटील, बी. एम. पवार, जे. डी. बंगाळे, निशा चव्हाण, अमोल चौधरी, संतोष पाटील यांच्यासह 21 गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
संवर्गनिहाय आरक्षण असे
एकूण 21 जागांपैकी 10 जागा सर्वसाधारण, तीन जागा अनुसूचित जमाती, तीन जागा इतर मागासवर्गीय, एक जागा विमुक्त जाती तर तीन जागा भटक्या जमातीसाठी राखीव आहेत. दरम्यान, टाकरखेडा, हिंगोणा, न्हावी, डांभुर्णी, आडगावात महिलांना संधी मिळणार आहे.
गावनिहाय आरक्षण असे
कोळवद- सर्वसाधारण (खेळाडू), टाकरखेडा- अनुसूचित जमाती (महिला), साकळी- सर्वसाधारण, हिंगोणा- सर्वसाधारण (महिला), चुंचाळे- सर्वसाधारण (माजी सैनिक), भालोद- इतर मागास, न्हावी- इतर मागास (महिला), शिरसाड- भटक्या जमाती, कोळन्हावी- अनुसूचित जमाती, यावल- विमुक्त जाती, सांगवी बुद्रूक- अनुसूचित जाती, डोंगरकठोरा- सर्वसाधारण, किनगाव बुद्रूक- भटक्या जमाती, डांभुर्णी- सर्वसाधारण (महिला), कोरपावली- सर्वसाधारण, आडगाव- सर्वसाधारण (महिला), अंजाळे- सर्वसाधारण (प्रकल्पग्रस्त), परसाडे बुद्रूक अनुसूचित जमाती (पेसा), फैजपूर – भटक्या जमाती ब, बामणोद- इतर मागास व दहिगाव- सर्वसाधारण.