यावल तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

0

किनगाजवळ अपघातात तरुण ठार तर शिरसाडला वृद्धाची आत्महत्या

यावल- तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. किनगावजवळ अपघातात तरुण ठार झाला तर शिरसाड शेत शिवारात वृद्धाने आजाराला कंटाळून गळफास घेतला.

खर्डीच्या खेळणी विक्रेत्या तरुणाचा मृत्यू
यावल- डांभूर्णी येथील यात्रोत्सवात खेळणी विकून चोपडा तालुक्यातील खर्डीकडे निघालेल्या पिता-पूत्रांच्या दुचाकी (एम.एच.19 ए.एल.7361) ला ओव्हरटेकच्या प्रयत्नात समोरून येणार्‍या पुरुषोत्तम उर्फ सुनील रामभाऊ साळी (35, रा.शिरसाड) यांच्या दुचाकी ( एम.एच.19 बी.पी. 8942) यांच्या दुचाकीने धडक दिल्याने ऋषिकेश भानुदास पाटील (28) ठार झाला तर त्याचे वडील भानुदास त्र्यंबक पाटील तसेच सुनील साळीदेखील जखमी झाले. गुरुवारी सायंकाळी सात वाजता हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळतास किनगावातील मिलिंद कोळी, पंकज पाटील, सचिन नायदे यांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक दीपक ढोमणे, हवालदार सिकंदर तडवी, गणेश मनुरे यांनी जखमींना रुग्णालयात हलवले. मृताच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परीवार आहे.

आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या
यावल- मूळचे शिरसाड रहिवासी व हल्ली कामानिमित्त सुरत येथे असलेल्या रामदास विठ्ठल मराठे (वय 67) यांनी आजारास कंटाळून शिरसाड शेतशिवारात गुरुवारी सकाळी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मराठे हे दोन दिवसांपूर्वीच शिरसाड या आपल्या गावी आले होते. गुरुवारी सकाळी शेतात कामाला जाणार्‍या मजुरांना नरेंद्र विठ्ठल सोनवणे यांच्या शेताजवळ (गट क्रमांक 49/1) रामदास मराठे यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार युनूस तडवी करत आहे.