यावल- लोकसभा निवडणुकीसाठी यावल मतदारसंघात सुमारे 65 टक्के मतदान झाले तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 62 टक्के मतदान झाले. निवडणुकीसाठी यावल तालुक्यात दोन लाख नऊ हजार 608 मतदार होते. तालुक्यात 204 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासून मततदारांसह नवमतदारांनी गर्दी केली होती.
भालोदला आमदारांनी केले मतदान
भालोद, ता.यावल येथे मतदान केंद्रावर आमदार हरीभाऊ जावळे यांनी सपत्नीक मतदान केले. नंतर यावल शहरात दाखल होत सकाळच्या सत्रात व दुपारपर्यंत शहरात दुचाकीव्दारे सर्वत्र फेरफटका मारत मतदानाचा आढावा घेतला. तालुक्यातील चिचोंली येथे सर्वात वयोवृध्द मतदार कौशल्याबाई रामदयाळ बेहेडे (94) व गंगुबाई त्र्यंबक बेहेडे (92) यांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील न्हावी येथे बोहल्यावर चढण्यापूर्वी नितीन धनगर यांनी हक्क बजावला. तालुक्यातील डांभुर्णी येथील मतदान केंद्रावर पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरूजित चौधरी यांनीदेखील हक्क बाजावला. शहरात शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा शरद कोळी यांनीदेखील बजावला. मतदान केंद्रावर कर्तव्य बजावण्यास अनेक जण धजावतात मात्र 12 एप्रिल रोजी अपघातात आपल्या डाव्या हाताला जबर दुखापत होवुन त्या हाताला प्लॅस्टर लावुन तालुक्यातील शिरसाड येथे मतदान केंद्रावर जावुन शिक्षक किशोर भटु पाटील हे कर्तव्य बजावतांना दिसले. शहरातील बाल संस्कार विद्या मंदिरातील ईव्हीएम यंत्र सकाळी सुरू झाले नाही परीणामी मतदारांची गैरसोय झाली. काही वेळेनंतर नवीन ईव्हीएम लावण्यात आल्यानंतर सुमारे 35 मिनिंटांनी येथे मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू झाली.