यावल- शहरातील 22 तर ग्रामीण भागातील पाच गावातील 20 अशा एकुण 42 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कडून पाचव्या दिवशाच्या गणरायाला सोमवारी मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. दुपारी एक वाजता शहरात पावसाला सुरुवात झाल्याने गारव्यासह उत्साह वाढला होता. शहरात पारंपारीक वाद्यवृंदाच्या गजरात सायंकाळी उशीरा मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहर व ग्रामिण भागात पोलिसांच्या चोख बंदोबस्तात श्रीचे शांततेत विसर्जन पार पडले.
सायंकाळी उशिरा मिरवणुकीला सुरुवात
सायंकाळी मुख्य मिरवणूक महाजन गल्ली, बोरावल गेट, म्हसोबा, गवत बाजार, काजीपुरा मस्जीद, चावडी, कोर्ट रोड मार्गे रेणूका देविच्या मंदिराजवळ येवुन मिरवणुकीची सांगता करण्यात आल. व तेथुन पुढे लहान मंडळांनी तारकेश्वर महादेव मंदिरा जवळील पालिकेच्या कुंडात तर काही मंडळांनी भुसावळ तापी पात्र तर काहींनी भुसावळ रस्त्यावरील हतनुर धरणाच्या कालव्यात गणरायाचे भक्तीपुर्वक विसर्जन केले तर काही मंडळांनी मिरवणुकीमध्ये सहभागी न होता परस्पर श्रींचे विसर्जन केले. घरगुती श्रीं च्या मुर्तीचे सकाळपासूनच विसर्जनास सुरवात झाली होती. विसर्जन शांततेत पार पाडावे यासाठी शहरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, फैजपूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे, उपनिरीक्षक सुनीता कोळपकर व सहकारी बंदोबस्तास होते. गृहरक्षक दलाचे गार्ड , एस. आर. पी. चे एक प्लाटून व दंगा नियंत्रण पथक असा बंदोबसत तैनात होता.
ग्रामिण भागात शांततेत निरोप
यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नायगाव दोन, कोरपावली तीन, डांभूर्णी तीन, दहिगाव नऊ व सावखेडासीम तीन अशा 20 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींना उत्साहपुर्वक शांततेत निरोप दिला.