यावल दरोड्यातील दुसरा संशयीत आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

सराफा दुकानावरील दरोड्याची उकल ; मुंबईहून पकडलेल्या आरोपीला 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

यावल : यावल शहरात सराफा दुकानावर पडलेल्या दरोड्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मुंबईतून निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड (32, रा. रामनगर ता.कन्नड, जि.औरंगाबाद ह.मु. कांदीवली पुर्व मुंबई) यास अटक केली आहे. गुरुवारी आरोपीला यावल न्यायालयात हजर केले असता त्यास 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या दरोड्यातील दुसरा संशयीत आरोपी चंद्रकांत उर्फ विक्की सोमनाथ चाले (लोणारी) (मोहित नगर, भुसावळ) यास गुरुवारी गुन्हे शाखेने अटक करून यावल पोलिसांच्या ताब्यात दिले.

7 रोजी यावलमध्ये पडला दरोडा
यावल शहरातील मुख्य बाजार पेठेतील सराफा बाजारातील व्यावसायीक बाजीराव कवडीवाले या सराफा दुकानात दुकान मालक व शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले हे 7 जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या दुकानात असतांना चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून सुमारे 12 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेवून पळ काढला होता.

सीसीटीव्हीवरून लागला दरोड्याचा तपास
स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवल्यानंतर खबर्‍यांचे नेटवर्क कामाला लावल्यानंतर शिवा गायकवाडचा शोध लावला. आरोपी मुंबईत सुरक्षा रक्षकाचे काम करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या बुधवारी त्याच्या मुंबईतील कांदीवली भागातून मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या चौकशीत त्यांनी हा दरोडा मुकेश प्रकाश भालेराव (रा.बोरावल, ता.यावल, ह.मु. तापीकाठ स्मशानुभमीजवळ, भुसावळ), सुनील अमरसिंग बारेला (रा.गोर्‍यापाडा, ता.चोपडा), रूपेश उर्फ भनभन प्रकाश चौधरी (रा.श्रीराम नगर, भुसावळ) आणि चंद्रकांत उर्फ विक्की सोमनाथ लोणारी (रा.मोहित नगर, भुसावळ) यांच्यासह केल्याची कबुली दिल्यानंतर आता पसार आरोपींचा पथकाकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

दुसरा आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
दरोड्यातील दुसरा संशयीत आरोपी चंद्रकांत उर्फ विक्की सोमनाथ चाले (लोणारी) (मोहित नगर, भुसावळ) हा भुसावळात असल्याची गुरुवारी गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली व यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएआय अशोक महाजन, शरीफोद्दीन काझी, किशोर राठोड, युनूस शेख, विनोद पाटील, रणजीत जाधव आदींनी आरोपीला अटक केली.

आरोपीला 22 पर्यंत पोलीस कोठडी
दरोड्याप्रकरणी अटकेतील आरोपी निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड (32, रा. रामनगर ता.कन्नड, जि.औरंगाबाद ह.मु. कांदीवली पुर्व मुंबई) यास गुरुवारी यावल न्यायालयात हजर केले असता त्यास 22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.नितीन खरे यांनी युक्तीवाद केला. तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी करीत आहेत.