यावल दरोड्यातील मुख्य आरोपी जाळ्यात
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फैजपूरच्या जंगलातून आरोपीला केली अटक : आतापर्यंत चौघा आरोपींना अटक
यावल : शहरातील मुख्य बाजारपेठेतील बाजीराव काशिदास कवडीवाले या सोने-चांदीच्या सराफी दुकानावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी मुख्य आरोपी मुकेश प्रकाश भालेराव (रा.बोरावल, ता.यावल, ह.मु.तापीकाठ स्मशानुभमीजवळ, भुसावळ) यास शनिवारी दुपारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे फैजपूरच्या जंगलातून अटक केली आहे. सराफा दुकानावरील दरोड्याप्रकरणी तिसरा पसार आरोपी यश विजय अडकमोल (22, रा.बोरावल गेट, यावल) यास शुक्रवारी अटक करण्यात आल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यास 22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरोड्याप्रकरणी आतापर्यंत एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय शरीफोद्दीन काझी, विनोद पाटील, रणजीत जाधव, युनूस शेख, किशोर राठोड आदींच्या पथकाने फैजपूरच्या जंगलातून संशयीत आरोपी मुकेश भालेराव यास शनिवारी दुपारी अटक केली.
पोलिसांनी जाणून घेतले गुन्ह्याचे प्रात्यक्षिक
गुरुवारी चंद्रकांत उर्फ विकी सोमनाथ चाले (लोणारी) (रा.मोहित नगर, भुसावळ) यास दरोडा पडलेल्या सराफ दुकानात नेण्यात आले व प्रत्यक्षात गुन्हा कसा घडला ? याची माहिती जाणून घेण्यात आली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार तापी नदीकिनारी साकेगाव शिवारात हनुमान मंदिराजवळील नाल्यात दाट झाडा-झुडूपात टाकलेल्या नोटा जप्त करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, हवालदार संजय तायडे, असलम खान, भूषण चव्हाण, गणेश ठाकणे, सुशील घुगे, चालक राहिल गणेश यांच्या पथकाने 15 हजार 380 रुपयांची रक्कम जप्त केली.
आरोपी यशवर दुकानाच्या रेकीची जवाबदारी
सराफ दुकानावर दरोडा टाकण्यापूर्वी यश अडकमोल याने संबंधित सराफ दुकानाची काही दिवस सतत येऊन बारीक-सारीक पाहणी केली होती. अटकेतील यश विजय अडकमोल याच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात यापूर्वी 18 एप्रिल 2019 ला सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
दरोड्याप्रकरणी चौघांना अटक
यावलमधील दरोड्याप्रकरणी आतापर्यंत निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड (32, रा. रामनगर ता.कन्नड, जि.औरंगाबाद ह.मु. कांदीवली पुर्व मुंबई), यश विजय अडकमोल (22, रा.बोरावल गेट, यावल), चंद्रकांत उर्फ विकी सोमनाथ चाले (लोणारी, रा.मोहित नगर, भुसावळ) या आरोपींना अटक करण्यात आली होती तर शनिवारी मुकेश भालेराव (भुसावळ) यास अटक करण्यात आल्याने एकूण अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात सुनील अमरसिंग बारेला (रा.गोर्यापाडा, ता.चोपडा) व रूपेश उर्फ भनभन प्रकाश चौधरी (रा.श्रीराम नगर, भुसावळ) हे पोलिसांना अद्यापही वॉण्टेड आहेत.